फलटण तालुक्याचं हक्काचं पाणी कमी होणार नाही : राधाकृष्ण विखे – पाटील यांची फलटणच्या शेतकर्‍यांना ग्वाही

। लोकजागर । फलटण । दि. ०१ मार्च २०२५ ।

‘‘फलटण तालुक्याचं हक्काचं पाणी कमी होणार नाही’’, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी फलटणच्या शेतकर्‍यांना दिली.

फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी माळशिरस व सांगोला तालुक्याला जाण्याची कुणकुण लागल्यामुळे पुणे येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकस्थळी फलटण तालुक्यातील शेतकरी पोचले होते. ही बैठक संपल्यानंतर मंत्री विखे – पाटील यांनी फलटणच्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.

प्रकल्पामध्ये पाणी वाटपाच्या धोरणात तुम्हाला ठरलेले पाणी इतरत्र कुणालाही देता येणार नाही. फलटण तालुक्याचं हक्काचं पाणी कमी होणार नाही. तुमच्यावर अन्याय होणार नाही; याची मी खात्री देतो. अशा शब्दात मंत्री विखे – पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांना आश्‍वस्त केले.

पाणी वापर संस्थांकडून पाणी पट्टीगोळा करुन एकरकमी जलसंपदा विभागाकडे भरली जाते. मात्र या संस्थाना शासनाकडून परतावा वेळेत मिळत नसल्याने या संस्था अडचणीत येत आहेत, अशी कैफियत शेतकर्‍यांनी मांडली असता ‘‘या मार्चअखेर परतावा दिला जाईल’’, असेही मंत्री विखे – पाटील यांनी यावेळी सांगितले.

Spread the love