अभिनयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सुबोध भावेंचा सन्मान
अभिनय कारकीर्दीला तब्बल २५ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे यांचा मसाप पुणे शाहूपुरी शाखेच्यावतीने सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सन्मान करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्हही भेट देण्यात आले. यावेळी मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे, मसाप पुणे शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, अजित साळुंखे, पद्माकर कुलकर्णी, मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, श्रीराम नानल आणि मान्यवर उपस्थित होते.
हरिष पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत रंगल्या दिलखुलास गप्पा
। लोकजागर । सातारा । दि. ०५ मार्च २०२५ ।
महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत थोर महापुरुषांनी जन्म घेतला, ही आपल्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मराठी भाषा ही जोपर्यंत व्यवहाराची भाषा होत नाही, तोपर्यंत तिचे भविष्य अंधांतरीच राहील. महाराष्ट्रात मराठीतच बोलायला हवे अन्यथा वापराअभावी माकडाचे शेपूट गळून पडले, हे आपण ऐकतो, तसंच काहीसं व्यवहारातील वापराअभावी मराठी भाषाही गळून पडण्याची भीती आहे. त्यामुळे मराठी भाषेतून संवाद साधण्यासाठी सर्वांनी हट्टीपणा ठेवायलाच हवा, असे स्पष्ट मत अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले. मला जर संधी मिळाली तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, अशा शब्दात सुबोध भावे यांनी भविष्यात छत्रपती संभाजी महाराजांवर व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात मराठी भाषा पंधरवडा सुरु आहे. या अंतर्गत अभिनेता सुबोध भावे यांची पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे आणि मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी शाहू कलामंदिर येथे प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मसाप पुणेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड.चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, पुस्तकप्रेमी व्हॉटसअप ग्रुपचे श्रीराम नानल, पदमाकर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

मुलाखतीच्या सुरूवातीलाच हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी यांनी सुबोध भावे यांची कारकिर्द एका संवादात गुंफली आणि एंट्रीलाच टाळ्या घेतल्या. सुबोध भावे म्हटलं की बायोपिक असं समीकरण महाराष्ट्रामध्ये आहे. या चरित्रपटाच्या प्रेमात तुम्ही कसे काय पडलात? यावर बोलताना ते म्हणाले, मी नाही पडलो, ते पडले… माझ्या करिअरची सुरुवातच प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेपासूनच झाली. २००० पासून माझे व्यावसायिक काम सुरु झाले. माझ्या करिअरची सुरुवात चरित्र अभिनयापासून झाली. संत निवृत्तीनाथ, महात्मा बसवेश्वर, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम अशा भूमिका नियतीनेच माझ्याकडून करुन घेतल्या असं मला वाटतं. एआय आल्यानंतर कलाकार म्हणून काय आव्हाने असतील? यावर बोलताना भावे म्हणाले, एआय हे शोधून देते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे सुरेश भटांच्या काव्याची निर्मिती एआय करु शकत नाही. आपण प्रत्येक जण स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न करत राहतो. यात अनेक चुका होतात. आपण पुन्हा प्रयत्न करतो. चुकांमुळेच माणूसपण टिकून आहे. मात्र, एआयमुळे हे प्रयत्नच थांबून मेंदूही निष्क्रीय होण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कट्यार’चा अनुभव कसा होता? यावर बोलताना भावे म्हणाले, कट्यार ही वैर, त्याग, सुडाची गोष्ट होती. नाटक बसवतानाच सिनेमाचा विचार करत होतो. मी साकारलेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटातील गोष्टच लोकांना आवडली.
छ. संभाजी महाराजांची भूमिका करावी, असं वाटतंय का? असे विचारले असता भावे म्हणाले, छत्रपती सभांजी महाराज यांच्यासारखी व्यक्ती जन्माला आली होती, जिची ध्येयनिष्ठा, धर्मनिष्ठा अतूट होती. या परिस्थितीही संभाजी महाराजांनी स्वराज्याला तसुभरही अंतर दिले नाही. किती मोठा त्याग आहे, त्यांची भूमिका का करायला आवडणार नाही? संभाजी महाराज केले तर जसे पंढरपुरला गेल्यानंतर प्रसाद म्हणून अंगावर उपरणे देतात तशी ही भूमिका माझ्यासाठी प्रसाद म्हणूनच असेल.मराठी चित्रपट सृष्टीत काय बदल झाले आहेत? या प्रश्नावर मत मांडताना भावे म्हणाले, बदल स्वीकारणारा प्रेक्षकच राहिला नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे, आम्ही अजून प्रेमकथेतून बाहेर पडलो नाही. गेल्या दोन वर्षांत एकही मराठी चित्रपट चालला नाही. जोपर्यंत मराठी चित्रपटांना लोकाश्रय लाभत नाही, तोपर्यंत दक्षिणेकडील तसेच हिंदी चित्रपटांप्रमाणे आम्हाला स्पर्धा करता येणार नाही. स्वत:ची कुठलही व्यक्तिरेखा आवडली, प्रत्येक भूमिकेसाठी मी जीव ओतला आहे. घाणेकरांची भूमिका अवघड होती, असे त्यांनी सांगितले.
ओटीटीच्या आव्हानाबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाले, ओटीटीचे माध्यम नसते तर भारत हा अनेक गुणी अभिनेत्यांना मुकला असता. छोट्या-छोट्या गावांमध्ये अभिनय दडलाय, तो ओटीटी, वेबसीरीजच्या माध्यमातून जगासमोर आला, हे चांगलंच झालं आहे. पुस्तक लिहिण्यासाठी कसा वेळ काढला? याबाबत विचारले असता भावे म्हणाले, नाटक ते चित्रपट असा प्रदीर्घ प्रवास करत असताना वेळेचा अभाव होता. पुस्तक लिहिण्याबाबत मनात होते. मात्र, हा वेळच नसल्याने प्रश्न होता. मात्र अभिनेता, दिग्दर्शक अभय इनामदार यांनी माझ्यासाठी हा वेळ काढला. मी सांगत गेलो, ते लिहित गेले आणि ‘घेई छंद..’ या पुस्तकाची निर्मिती झाली, असेही भावे म्हणाले.
तुफान रंगलेल्या या मुलाखतीत हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी यांच्यासमवेत सुबोध भावे यांची जोरदार जुगलबंदी रंगली. मुलाखतकारांच्या आडव्या-तिडव्या प्रश्नांना सुबोध भावेंनी गमतीदार उत्तरे दिली. नटसम्राटमधील संवाद सादर करून दाखवण्याचा सातारकरांचा हट्टही सुबोध भावे यांनी पुरवला. त्यांच्या त्या संवादफेकीने आख्खे शाहूकला मंदिर टाळ्यांच्या गजरात दुमदुमले.
मुलांच्या भावविश्वावर चित्रपट करणार
मुलांच्या भावविश्वावर आधारित चित्रपट करताना तो एक मित्र म्हणून करायला हवा. मुलांना शहाणपणा शिकवायचा नाही तर तर त्यांना शहाणं करायचं. होमिओपॅथिच्या गोळ्या जशा मुले आवडीने खातात. गोष्ट सांगत दिलेलं इंजेक्शन मुले नाकारत नाहीत. मुलांच्या भावविश्वावर आधारित चित्रपट करण्याचं मी प्रॉमिस देतो. कोरोनाच्या काळात सुबोध दादाची गोष्ट ही संहिता मुलांना खूप आवडली होती, तीही पुन्हा सुरु करणार आहे, असेही भावे यांनी सांगितले.