| लोकजागर | मुंबई | दि. ०७ मे २०२५ |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणताही विलंब न करता व कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घेऊन नगरसेवक, महापौर, सभापती पदांचे पूर्ववैभव आणावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था लागू केली गेली व सत्तेचे विकेंद्रीकरण केले. यातून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, सभापती अशी सत्तेची विभागणी झाली पण मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकाच घेतल्या नाहीत. केंद्रात मोदीशाह व राज्यात फडणवीस यांना सत्ता आपल्याच हाती हवी होती या आग्रही भूमिकेमुळे या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयानेच निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने आतातरी निवडणुका घेऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करावे असे सपकाळ म्हणाले.