। लोकजागर । फलटण । दि. ०८ मे २०२५ ।
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही दि. १४ ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून फलटण शहर व तालुक्यातील अबालवृद्धांनी त्यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४७ वी पुण्यतिथी दि. १४ मे २०२५ आणि माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची १०० वी जयंती दि. २५ मे २०२५ रोजी येत असून त्या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठाच्यावतीने दि. १४ ते २५ मे दरम्यान स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १४ मे रोजी स्मृती महोत्सवाचे उदघाटन आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सहकार महर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना जाहीर झाला असून त्यांच्यावतीने डॉ. विनय कोरे यांच्याकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
गुरुवार दि. १५ मे रोजी स्वरश्रुती हा श्रीकांत सावंत प्रस्तुत जुन्या नव्या हिदी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
शुक्रवार दि. १६ मे रोजी गिर्यारोहण काळाची गरज व तरुणाईला आवाहन या विषयावर दिलीप केशवराव नाईक निंबाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. माजी आमदार दिपकराव चव्हाण हे अध्यक्षस्थानी असतील.
शनिवार दि. १७ मे रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद भीमसेन जोशी यांचा संतवाणी हा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि. १८ मे रोजी छ. राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब आणि मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा या विषयावर प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील.
सोमवार दि. १९ मे रोजी मी जिजाऊ बोलतेय हा एकपात्री नाट्य प्रयोग व व्याख्यान : डॉ. प्रतिभा जाधव – निकम, नाशिक.
मंगळवार दि. २० मे रोजी मकरंद टिल्लू सादर करतील हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हा एकपात्री प्रयोग.
बुधवार दि. २१ मे रोजी तापमान बदलाची कृषी ग्रामीण विकासापुढील आव्हाने या विषयावर पोपटराव पवार यांचे व्याख्यान, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे अध्यक्षस्थानी असतील.
(फलटण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी मार्गदर्शक व्याख्यान)
गुरुवार दि. २२ मे रोजी बबल शो : बोलक्या बाहुल्या हा शो चैत्राली माजगावकर सादर करतील.
शुक्रवार दि. २३ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी शिक्षक व सेवक कलावंत सादर करतील कलाविष्कार,
शनिवार दि. २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी विविध शाखांतील विद्यार्थी कलावंत सादर करतील कलाविष्कार,
रविवार दि. २५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप, बक्षीस वितरण व सत्कार. हस्ते आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण.
स्मृती महोत्सवातील दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजित सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल प्रांगणातील रंगमंचावर दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहेत.