। लोकजागर । सातारा । दि. 12 जुलै 2025 ।
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्याचा आनंद सर्वदूर पसरु लागला आहे. या संमेलनात खारीचा तरी वाटा माझा असावा, यासाठी देणगीचा ओघ वाढत आहे. इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे वाचवून संमेलनासाठी देणगी दिली. संपूर्ण शाळेने देणगी देण्याचा पहिला बहुमान ‘किड्स वर्ल्ड’ने मिळविला.

ही शाळा आहे, सातारा शहरालगतच्या जकातवाडी येथील. श्री बालाजी शिक्षण संस्थेची किड्स वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूल. इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही मराठी भाषा आणि साताऱ्याच्या मातीशी असलेली आपुलकी त्यांनी दाखवून दिली.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या १५० विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे वाचवून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रत्येकाने ९९ रुपयांची देणगी दिली. शिवाय, शिक्षकांनीही प्रत्येकी ९९९ रुपयांची देणगी दिली. संपूर्ण शाळेने २१ हजार रुपयांची देणगी दिली असून, संपूर्ण शाळेने एकत्रित देणगी देण्याचा पहिला बहुमान या शाळेने मिळविला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. यावेळी शाहूपुरी शाखेचे कोषाध्यक्ष सचिन सावंत, संजय माने, अमर बेंद्रे, वजीर नदाफ आदी उपस्थित होते.

नंदकुमार सावंत म्हणाले, साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी स्वत:च्या खाऊचे पैसे व पगारातील पैसे देणारी जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी संमेलनासाठी आवश्यक यावे. संमेलनातून विद्यार्थी, शिक्षकांनी ऊर्जा मिळेल.
९९ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी कोणतीही मदत लागली तर आमच्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी पडेल ते काम करण्यास तयार आहेत, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष यशवंत सणस, खजिनदार चंद्रकांत सणस यांनी दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जाधव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष योगेश शिंदे यांनी आभार मानले. योगेश शिंदे, सचिव दीपक देवकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक उपस्थित होते.
शाळांची नाव संमेलनाशी जोडा
साताऱ्यात होणारे ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे प्रत्येक सातारकरांचे आहे. मग, ते मराठी माध्यम असो की इंग्रजी माध्यमांच्या शाळा. सर्वांनीच त्यासाठी पुढाकार घेणे योग्य ठरणारे आहे, असा आदर्श किड्स वर्ल्ड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने घालून दिला आहे. तब्बल तीन दशकांनी हे संमेलन होणार असून, ते भव्य करणाऱ्यांसाठी प्रत्येक शाळांनी, शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांनी हिरारीने पुढे यायला हवे.
साहित्यात राजकीय लोकांचा सहभाग नको, असे बहुतांशी लोकांना वाटते. परंतु, साहित्य संमेलन घेताना होणारा खर्च लोकसहभागातून पार पाडण्यासाठी बहुतांश लोक पुढे येताना दिसत नाहीत. साताऱ्यातील ९९ वे मराठी साहित्य संमेलन राजकीय लोकांचा आर्थिक हातभार न घेता, सर्वसामान्य सातारकरांच्या निधीतून संमेलन पार पडले, असा इतिहास रचला जावा, यासाठी प्रत्येक सातारकराने संमेलनासाठी देणगी द्यावी. राजकीय आश्रयाशिवाय संमेलन पार पडतात, हे साताऱ्यातून दाखवून देण्याची संधी आहे.
– नंदकुमार सावंत
अध्यक्ष, शाहूपुरी शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे.