नीरा देवघर प्रकल्पाला केंद्रीय निधीची अंतिम मान्यता — माढा मतदारसंघासाठी ऐतिहासिक पाऊल

| लोकजागर | फलटण | दि. २१ ऑगस्ट २०२५ |

माढा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नीरा देवघर प्रकल्प आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. सुमारे ₹3900 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा समावेश केंद्रीय कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी 2019 पासून सातत्याने प्रयत्न सुरू होते, यास अखेर यश मिळाले आहे, अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, CWC चे चेअरमन अतुल जयंत, सदस्य पाटणकर, चीफ इंजिनिअर शेंगर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी केंद्रीय निधी गुंतवणुकीला अंतिम मान्यता देण्यात आली.

या मान्यतेनंतर माळशिरस तालुक्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कालव्याचे काम पूर्ण होणार असून, पुढील टप्प्यात केंद्रीय निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याच बैठकीत उरमोडी व जिहे कटापूर योजनांनाही निधी व मान्यता मिळाली असल्याचेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

ही घडामोड माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे घडली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, तत्कालीन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याचे कौतुक केले.

राज्य सरकारनेही केंद्राकडे प्रकल्प शिफारस व निधी उपलब्ध होईपर्यंत राज्य निधीतून तरतूद केली होती. आता हा प्रकल्प गतीमान होत असून लवकरच शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळणार आहे, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Spread the love