। लोकजागर । सातारा । दि. ३ जानेवारी २०२६ ।
“सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने मिळवलेले यश ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. विशेषतः फलटणमध्ये अतिशय अटीतटीच्या सामन्यात आम्ही चांगल्या फरकाने विजय मिळवला. ही लढाई अत्यंत महत्त्वाची होती. त्या ठिकाणी ‘आपले कोण आणि बाहेरचे कोण’ असे प्रश्न निर्माण झाले होते. आपलेच काही मित्र तेथे येऊन कशा पद्धतीने भाषणे करत होते, हे सर्वांनी पाहिले. मात्र, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मी कुणाच्याही विरोधात बोललो नाही.
मी भारतीय जनता पार्टीसाठी, सकारात्मक भूमिका घेत विकासाच्या मुद्द्यावर मत मागितले. फलटणच्या जनतेसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनेही विकासाला आणि सकारात्मकतेला मत देत आम्हाला कौल दिला,” असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सातारा येथे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भव्य सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि विजयी नगरसेवकांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील ७ नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल आनंद व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटली.
या कार्यक्रमास मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदनदादा भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, धैर्यशीलदादा कदम, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, सत्यजित पाटणकर, चित्रलेखाताई माने कदम, सुरभी भोसले, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमोल मोहिते – सातारा, समशेरसिंह नाईक-निंबाळकर – फलटण, सौ. पूजा विरकर – म्हसवड, श्री. तेजस सोनवणे – मलकापूर, श्री. अनिल सावंत – वाई, सौ. वैशाली माने – रहिमतपूर, सौ. रुपाली वारगडे – मेढा या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
