प्रभाग क्रमांक ८ च्या स्वच्छतेबाबत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गाठून मांडली भूमिका
। लोकजागर । फलटण । दि. ११ जानेवारी २०२६ ।
फलटण नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी प्रभाग क्रमांक ८ मधील स्वच्छतेच्या कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास येताच नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्याधिकाऱ्यांचे दालन गाठले. प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न आणि कर्मचाऱ्यांची कामातील चालढकल याबाबत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
स्वच्छतेचा बोजवारा आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
गेल्या काही दिवसांपासून कसबा पेठ, तेली गल्ली उतार यासह प्रभाग क्रमांक ८ मधील सार्वजनिक स्वच्छतेबाबत तक्रारी येत होत्या. आरोग्य विभागाचे कर्मचारी कामात टाळाटाळ करत असल्याने कचरा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सिद्धाली शहा यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
जबाबदारी निश्चितीसाठी नवीन प्रस्तावाची मागणी
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिद्धाली शहा यांनी एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल सुचवला आहे. प्रत्येक तीन प्रभागांमागे एक स्वतंत्र ‘स्वच्छता निरीक्षक’ नियुक्त करावा, अशी लेखी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे कामाचे योग्य नियोजन होईल आणि वेळेचा अपव्यय टळेल. अशा प्रकारची नियुक्ती केल्यास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुक करता येईल आणि काम न करणाऱ्या निरीक्षकावर थेट जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे प्रशासनाला सोपे जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईचे संकेत
नगरसेविका शहा यांनी मांडलेली वस्तुस्थिती आणि आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, लोकप्रतिनिधींनी थेट कार्यालयात येऊन जाब विचारल्याने पालिका वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
