| लोकजागर | फलटण | दि. २४ जानेवारी २०२५ |
‘‘वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यासाठी वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. यासाठी शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सतत वाचन करून नव्या पिढीला वाचनाचा कानमंत्र दिला पाहिजे. मराठी भाषा साहित्य आणि वाचन संस्कृतीमध्ये शिक्षकांनी योगदान दिले तर भावी पिढी सक्षम निर्माण होईल’’, असे मत प्रसिद्ध वक्ते प्राचार्य रविंद्र येवले यांनी व्यक्त केले.
येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सदगुरू प्रतिष्ठान, श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 12 व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्या सत्रात प्राचार्य रविंद्र येवले यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी भाषा, साहित्य आणि वाचन संस्कृतीमध्ये शिक्षकांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादात राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे (कोल्हापूर), ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे (फलटण) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्यवाह ताराचंद्र आवळे (फलटण) यांनी सहभाग घेतला.
आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य येवले पुढे म्हणाले, ‘‘एक शिक्षक चुकला तर पिढी बरबाद होते. त्यामुळे शिक्षकांनी आपले काम हे चोख बजावले पाहिजे. जगामधील ज्येष्ठ विचारवंतांचा विचार करता त्यांनी सर्वप्रथम आपणा स्वतःला वाचनामध्ये गुंतवून घेतले होते. त्यामुळे ती माणसे जगात मोठी झाली. फलटण ही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची कर्मभूमी; या भूमीमध्ये साहित्य आणि वाचन संस्कृतीसाठी धडपड केली जात आहे हा खर्या अर्थाने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वारसा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे ज्ञानभाषा ही खुली झाली असून आपले मराठीतील साहित्य जास्तीत जास्त वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झाले पाहिजे तसेच इंग्रजी भाषेमध्ये प्रामुख्याने भाषांतरित होणे काळाची गरज आहे’’.
सागर बगाडे म्हणाले, ‘‘संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज आहे. ज्या देशाची संस्कृती लोप पावली तो देश जगाच्या नकाशावरून कधी नष्ट होतो हे समजतही नाही. आपल्या कला, कौशल्य आणि संस्कृती याचे जतन करण्यामध्ये शिक्षकांचे योगदान असणे फार मोलाचे आहे. शिक्षक हा फक्त एका कालावधीपुरता मर्यादित नसून तो अनंतकाळ हा समाजाला दिशादर्शक असतो, प्राचीन काळापासून ते आत्ताच्या या संगणक युगापर्यंत वेगवेगळे बदल झाले तरीसुद्धा भारतीय संस्कृती ही टिकून आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या संस्कृतीत असणारी विविधता. विविधतेने नटलेल्या या भारत देशामध्ये मराठी भाषा ही अलंकारिक भाषा असून या भाषेचे सौंदर्य जगाला भुरळ घालते. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृती निर्माण केल्या आणि त्या अजरामर ठरल्या. महाराष्ट्राचा सांस्कृतिक व वैचारिक वारसा फार मोठा असून तो भारत देशाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा आहे.’’
माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले, ‘‘वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे शिक्षकांनी पहिल्यांदा स्वतः वाचन संस्कृती वाढीस लावली पाहिजे. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन विद्यार्थ्यांना सजग केले पाहिजे. शिक्षकांनी व्याख्याने, साहित्य संमेलन याला उपस्थिती दर्शवून जास्तीत जास्त ऐकले पाहिजे. ऐकण्याने आपले मस्तक सुधारते, मस्तक सुधारले की आपोआपच मानवाचा मेंदू हा तल्लख होतो व नवनव्या कलाकृती जन्मास येतात. शिक्षकांनी वाचलेल्या टिपण्या काढल्या पाहिजेत. त्याचा सारांश लिहिला पाहिजे. त्यावर चिंतन म्हणून त्यातील चांगला भाग हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचण्यास उपलब्ध करून दिली पाहिजेत. आज चांगल्या पुस्तकांना चांगला वाचक मिळणे ही काळाची गरज झाली आहे. अनेक चांगली पुस्तके उपलब्ध आहेत परंतु ती वाचकाच्या हाताला लागतीलच असे नाही. त्यामुळे शाळेतील ग्रंथालय हे विद्यार्थ्यांसाठी सतत खुले करून दिले पाहिजे. ग्रंथालयामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून उपक्रम राबवले पाहिजेत व त्यातून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक टिकून राहण्यासाठी वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.’’
ताराचंद्र आवळे यांनी यावेळी आपल्या विद्यालयातील ग्रंथालयामार्फत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन शिक्षकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला मी कसा घडलो व माझ्या जीवनातील पुस्तकांचे महत्त्व याविषयी त्यांनी अतिशय समर्पक उदाहरण देऊन आपण एकाकी असतो तेव्हा पुस्तके कसे आपणाला मदत करतात याची उत्तम उदाहरणे दिली. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा वाटाड्या व खरा दिशादर्शक असतो यावर त्यांनी परखडपणे भाष्य करून, ‘‘शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे दालन खुले करून दिले तर निश्चितच वाचन संस्कृती वाढीस लागेल’’, असेही ताराचंद्र आवळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रा. रवींद्र कोकरे म्हणाले. ‘‘महाराष्ट्र ही संतांची, महंतांची, विचारवंतांची भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक थोर महात्मे होऊन गेले. त्यामुळेच अशा चांगल्या संमेलनाचा भाग होता येत आहे. साहित्य व संस्कृती रुजवत असताना साहित्यिकांचा फार मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेची फलटण शाखा हे एक साहित्यिकांचे माहेरघर आहे. यातून अनेक साहित्यिक निर्माण झाले व त्यामुळेच साहित्याचा वसा व वारसा पुढे जपला जात आहे. साहित्यिकाने लिखाण करत असताना सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून जर लिखाण केले तर निश्चितच त्यांना चांगला वाचक वर्ग निर्माण होतो. असे साहित्यिक या फलटणमध्ये निर्माण झालेले आहेत त्यामुळेच फलटणची साहित्य संस्कृती ही आगळीवेगळी संस्कृती आहे.’’
प्रा. रवींद्र कोकरे यांनी यावेळी फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्य कृती यावर सुंदरपणे प्रकाश झोत टाकला. प्राचार्य शिवाजीराव भोसले ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यांच्या साहित्याचा ओघवत्या भाषेत आढावा घेतला व कोणत्या साहित्यिकांनी कोणत्या प्रकारची पुस्तके लिहून मराठी साहित्य समृद्ध केले यावर योग्य अशी टिपणी केली. यावेळी त्यांनी आपल्या विशिष्ठ शैलीत ‘वांग’ ही कथा सादर करून सभागृह खळखळून सोडले. त्यांच्या गावरान भाषेचा तडका साहित्य रसिकांना चांगलाच भावला. त्यामुळे हास्याचे फवारे उडाले.