महाराष्ट्र साहित्य परिषदेने उभारला नाटककार प्रा. वसंत कानेटकरांचा अर्धपुतळा

। लोकजागर । सातारा । दि. ०२ फेब्रुवारी २०२५ 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रामीण भागातील शाखा अतिशय दमदार कामगिरी करत आहेत. अशीच कामगिरी मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील साताऱ्यातील शाहुपुरी शाखेने केली आहे. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे प्रसिध्द नाटककार, लेखक, पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी त्यांचा अर्धपुतळा उभारुन यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे. चौंडेश्वरी शिक्षण संस्था, उमाताई कानेटकर सार्वजनिक वाचनालय, मसाप रहिमतपूर शाखा,आणि शाहुपुरी शाखा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि आ. मनोजदादा घोरपडे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ.राजेंद्र शेंडे, अरुण माने, अरुण कानेटकर, मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, रवींद्र बेडकिहाळ, धैर्यशील कदम, संपतराव माने, वासुदेव माने, चित्रलेखा माने-कदम, सचिन बेलागडे यांच्या उपस्थितीत. रहिमतपूर येथे प्रा. वसंत कानेटकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

वसंत कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला.रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यापैकी एक असलेले निसर्ग कवी गिरीश हे त्यांचे वडील. शिक्षण घेत असताना प्रा.कानेटकरांना वि.स.खांडेकर आणि कन्नड साहित्यिक, विलिंग्डन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य वि.कृ.गोकाक या दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्याचा आणि पाश्चात्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककरांचा प्रा.कानेटकरांवर खोलवर प्रभाव पडला. त्यांच्या घर, पंख आणि पोरका या कादंब-या गाजल्या नाटककार म्हणून त्यांना विशेष प्रसिध्दी लाभली. वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक त्यानंतर एकूण ४२ नाटके त्यांनी लिहिली. प्रेमा तुझा रंग कसा ?, रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा, अश्रूंची झाले फुले, लेकुरे उदंड झाली, मला काही सांगायचय आणि हिमालयाची सावली ही विशेष उल्लेखनीय नाटके होत. मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करुन प्रा.कानेटकरांनी त्यांना नवे स्वरुप दिले.

काही महिन्यांपूर्वीच परिषदेच्या शाहुपुरी शाखेने कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांच्या घराचे स्मारकात रुपांतर आणि त्याचे लोकार्पण केले आहे. आता रहिमतपूर येथे प्रा.कानेटकरांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. येणाऱ्या काळात सातारा जिल्हयातील नामवंत साहित्यिकांचे स्मारक करण्याचा प्रयत्न मसाप,पुणे शाहुपुरी शाखेचा राहणार आहे. शाहुपुरी शाखेने आपल्या वैविध्यपूर्ण कार्याने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला असून या शाखेमुळे मसाप, पुणेच्या कार्यात ही ऐतिहासिक अशी नोंद झाली आहे.चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे अरुण माने हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असले तरी ज्यांच्या जागेत संस्थेची उभारणी झाली त्या प्रा.वसंत कानेटकराबद्दल त्यांना नेहमीच आदर राहिला आहे. प्रा.कानेटकर यांनी त्यांचा वाडा शाळेला दिला. याठिकाणी सध्या कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे.प्रा. कानेटकरांचे वडील कवी गिरीश व स्वत: कानेटकर हे शिक्षक होते. प्रा. कानेटकर यांची आपल्या जागेमध्ये शाळा व्हावी अशी इच्छा होती म्हणून त्यांनी ही जागा संस्थेला दिली. हा वाडा संस्थेला देण्यासाठी कानेटकर यांचे पुतणे प्रा. अरुण कानेटकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या जागेत कवी गिरीश यांचे स्मारक संग्रहालय, कानेटकरांच्या आई उमाताई कानेटकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आहे. ही जागा तेरा गुंठे असून आता या जागेत कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अर्धपुतळ्याचे अनावरण रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, चौंडेश्वरी शिक्षण संस्था, मसाप रहिमतपूर शाखा, उमाताई कानेटकर सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love