‘इन्कमटॅक्स’ धाडीची नक्की भानगड काय?

। लोकजागर । फलटण । दि. 0७ फेब्रुवारी २०२५ ।

गत दोन दिवसांपासून फलटणच्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर सुरु असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या तपासणीमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे राजकारण, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्त्व असल्याने या धाडीची चर्चा राज्यभरात सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘इन्कम टॅक्स’ ची धाड म्हणजे नक्की काय भानगड असते?, या धाडीसाठी कोणाची परवानगी असते?, धाडी दरम्यान काय घडामोडी घडू शकतात? असे अनेक प्रश्‍न सर्वसामान्यांना सतावत आहेत. त्यामुळे या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘लोकजागर’ ने विविध माध्यमांमधून या पूर्वी अशा प्रकरणांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख याचे अवलोकन केले. त्याआधारे याबाबत ‘लोकजागर’ करण्याचा हा प्रयत्न….

फलटणच्या धाडीविषयी थोडक्यात

दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गोविंद मिल्क या नामांकित कंपनीचे प्रमुख श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘सरोज व्हिला’ येथे प्राप्तिकर विभागाची टिम धडकली. श्रीमंत संजीवराजे यांच्यासह गोविंद मिल्कच्या सर्व संचालकांच्या आर्थिक व्यवहारांची या यंत्रणेकडून तपासणी सुरु झाल्याची वार्ता सर्वत्र वार्‍याच्या वेगाने पसरली. ही तपासणी आज दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुद्धा अद्याप सुरु आहे. अचानक सुरु असलेल्या या कारवाईमुळे फलटण शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते रोजचा तपास सुरु असेपर्यंत थांबून रहात आहेत. नक्की हा तपास कधी थांबतो? आणि तपासात काय पुढे येते याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.

धाडीचे आदेश कोणाचे असू शकतात?

प्राप्तिकर विभाग, सी.बी.डी.टी. अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित येणारे सक्त वसुली संचानालय म्हणजेच बहुचर्चित ई.डी. या यंत्रणा असे आदेश निर्गमीत करु शकतात. जे प्राप्तिकर भरत नाहीत, प्राप्तिकर बुडवतात किंवा परदेशात जास्त व्यवहार करतात अशा व्यक्ती अथवा कंपन्यांवर या यंत्रणांची बारिक नजर असते. कुठल्याही ठिकाणी धाड टाकण्यापूर्वी या यंत्रणांना प्राप्तिकर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते.

धाड आणि गुप्तता

प्राप्तिकर विभागाकडून अशा कारवाईबाबत प्रचंड गुप्तता पाळली जाते. संबंधित संशयित व्यक्तीला सावरण्याची संधी देता येवू नये यासाठी अशा धाडी पहाटे किंवा रात्री उशिरा घातल्या जातात. तपास यंत्रणेकडे छाप्या बाबतचे वॉरंट असते. तपासाची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ती कधी संपेल? किती वेळ चालेल? ती किती लांबेल? याबाबत कुणालाही कसलीही कल्पना दिली जात नाही.

कशी चालते कारवाई?

प्राप्तिकरासंबंधीच्या धाडी प्राप्तिकर कलम १३२ अंतर्गत येतात. या कलमानुसार तपासयंत्रणेतील अधिकारी कोणत्याही व्यक्तीच्या व्यवसायावर अथवा घरावर धाड टाकू शकतो. ही कारवाई कधीही आणि कोणत्याही वेळेला होऊ शकते शिवाय कारवाई संपण्यासाठी निश्‍चित अशी कोणतीही वेळ मर्यादा, काल मर्यादा नसते. तपासी अधिकारी धाडीदरम्यान आवश्यकतेनुसार कठोर कारवाई करु शकतात; जसे की अनेक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे छत तोडणे, भिंती तोडणे इत्यादी. तपासणी काळात अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या लोकांना कुठेही बाहेर जाता येत नाही. धाडीच्या वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी या अधिकार्‍यांसह पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि गरजेनुसार निमलष्करी दल देखील उपस्थित असते.

प्रामुख्याने काय तपासले जाते?

धाडी दरम्यान ज्यांच्या संबंधी तपासणी आहे त्या सर्वांना एका जागेवर बसवले जाते. त्यानंतर घरात ठेवलेले पैसे, दागिने, कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन ताब्यात घेतले जातात. याचबरोबर सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी केली जाते.

काय करणे हिताचे?

अशी धाड पडल्यास तपासी अधिकार्‍यांना सर्वतोपरी सहकार्य करणे क्रमप्राप्त ठरते. आवश्यक ते सर्व दस्तऐवज तपासणीसाठी देणे, तपास कार्यात कोणताही अडथळा येऊ न देणे, कोणताही दस्तऐवज नष्ट करण्याचा प्रयत्न न करणे आदी गोष्टी हितावह ठरतात.

Spread the love