संजय गांधी निराधार योजना व श्रावळबाळ योजना : डी.बी.टी. पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार अर्थसहाय्य

। लोकजागर । मुंबई । दि. 0८ फेब्रुवारी २०२५ ।

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच माहे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ चे अर्थसहाय्य करण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून जारी करण्यात आला आहे. दि. २८ जानेवारी २०२५ पर्यंत या योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल २९ लाख ७७ हजार २५० इतकी असून त्यापैकी १९ लाख ७४ हजार ०८५ लाभार्थ्यांनी या पोर्टलवर आपले आधार व्हॅलिडेट केलेले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुर्ण करेपर्यंत सुमारे १० लाख लाभार्थी लाभापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावळबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२५ या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका / मंडलस्तरावर विशेष मोहिम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकार्‍यांना विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.

Spread the love