नवीन बसमधून प्रवास करताना फलटण सुधारतय याची प्रचिती येईल : रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण आगाराच्या १० नवीन एस. टी. बसेसचे लोकार्पण

। लोकजागर । फलटण । दि. १४ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘फलटण आगारात सुविधा निर्माण करण्याचा आपण संकल्प घेतला होता. त्यानुसार इथे काँक्रीटीकरण करण्यापासून बस स्थानकातील दुरावस्था दूर करणे आणि प्रवाशांसाठी सुविधा देण्याचे काम आपण करीत आहोत. फलटण आगारात १० नवीन अत्यंत चांगल्या बसेस तालुक्याच्या सेवेमध्ये दाखल झाल्या आहेत. चार्जिंग स्टेशन, पुशबॅक सुविधा या नवीन बसेसमध्ये उपलब्ध आहेत. येत्या काळात आणखी १० नवीन बसेस, चार्जींग स्टेशनची उभारणी झाल्यावर इलेक्ट्रीक बसेस, ग्रीन बसेस उपलब्ध होतील. या अत्याधुनिक बसेसमधून प्रवास केल्यानंतर फलटण बदलतय, फलटण सुधारतय याची प्रचिती येईल’’, असा विश्‍वास माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या मागणीनुसार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून व राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने फलटण आगारासाठी मंजूर 20 नवीन बसेस पैकी १० बसेसचे उद्घाटन व लोकार्पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज फलटण बसस्थानकात संपन्न झाले. त्यानंतर या नवीन बसमधून केलेल्या प्रवासादरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील उपस्थित होते.

आमदार सचिन पाटील म्हणाले, ‘‘विकासाची गाडी सुसाट निघाली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यात विकासाचं पर्व वाहत आहे. फलटण आगारात गोरगरीबांची नवीन लाल परी गेल्या २० वर्षात आली नव्हती. ती आज आली आहे. या नवीन बसेस मुळे विशेषकरुन तालुक्यातील विद्यार्थीनींची अडचण दूर होणार आहे.’’

यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना धन्यवाद दिले.

प्रारंभी फलटण बसस्थानकात या नवीन बसचे उद्घाटन व लोकार्पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व आ. सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रवासी संघटना अध्यक्ष शिवलाल गावडे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, विभागीय भांडार अधिकारी गायकवाड, प्रभारी व्यवस्थापक राहुल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, चव्हाण, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव आहिवळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धिरज अहिवळे, वरिष्ठ लिपीक लहु चोरमले, कुलदीप चव्हाण, धीरज खुळपे, लक्ष्मण धायगुडे यांच्यासह फलटण आगारातील चालक, वाहक, कर्मचारी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love