संपूर्ण उन्हाळ्यात उपक्रम राबवण्याचा निर्धार; गोसेवेच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन
। लोकजागर । फलटण । दि. २८ फेब्रुवारी २०२५ ।
उन्हाळ्यात चार्याची टंचाई निर्माण होऊन अन्नाविना मोकाट गायींना मोठा त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून मोकाट गायींना मुक्त करण्यासाठी मुक्या जनावरांसाठी फलटण शहरात कार्यरत असलेल्या सुखकर्ता एन.जी.ओ. संस्थेने संपूर्ण उन्हाळ्यात अशा जनावरांना दररोज मोफत चारा वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे फलटणकरांकडून कौतुक होत आहे. सदरचा उपक्रम राबवण्यासाठी अक्षय तावरे, शाम पवार, आदित्य कर्णे,जय रणवरे, सागर गोळे, प्रियांशु योगे, समर्थ टकसाळे, विवेक वाणे, सार्थक देशपांडे, आर्यन माने, प्रणव चव्हाण, तनुज सरतापे, गौरव भोसले हे विशेष परिश्रम घेत आहेत.
या उपक्रमाबाबत ‘लोकजागर’ शी बोलताना संस्थेचे प्रमुख पदाधिकारी शाम पवार यांनी सांगितले की, ‘‘उन्हाळ्यात मोकाट गायींना अन्नाची टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावते. उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाताना ही समस्या अधिक भिषण बनते. सन २०२३ मध्ये ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर गतवर्षी सन २०२४ मध्ये आम्ही संपूर्ण उन्हाळ्यात ‘दैनिक चारादान’ उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे मोकाट गायींना अन्नाच्या टंचाईचा त्रास सहन करावा लागला नाही. त्यामुळे यंदाच्यावर्षीही संस्थेने हा ‘दैनिक चारादान’ उपक्रम दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु केला आहे. या उपक्रमानुसार रोज सायंकाळी सव्वा सहा वाजता फलटणच्या विमानतळावर आम्ही मोकाट जनावरांना चारादान करतो. जोपर्यंत पावसाळा सुरु होत नाही तोपर्यंत आमचा हा उपक्रम सुरु राहणार आहे.’’

दरम्यान, ‘‘गोसेवेच्या या कार्याशी जुडण्यासाठी व आपले मौल्यवान योगदान देण्यासाठी फलटणकरांनी 73 87 123 106 या क्रमांकावर संपर्क साधावा’’, असे आवाहनही सुखकर्ता संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.