मराठी भाषा संवर्धनासाठी बालसाहित्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे : लेखक शरद तांदळे

मसाप, शाहुपुरी शाखा, सातारा नगरपालिका आयोजित मराठी भाषा पंधरवड्यास प्रारंभ

। लोकजागर । सातारा । दि. ०१ मार्च २०२५ ।

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनासाठी आता केंद्राकडून 500 कोटी मिळणार आहेत, त्याचा उपयोग मराठी भाषेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी नक्कीच होईल. त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धनासाठी बालसाहित्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत रावण कादंबरीचे लेखक शरद तांदळे यांनी व्यक्त केले.

येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर बेडकिहाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरीचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष चंद्रकांत बेबले उपस्थित होते.

पुढे बोलताना लेखक शरद तांदळे म्हणाले,  मराठीतील सर्व साहित्य एकत्र झाले पाहिजे. आत्ताचे लेखक फक्त पुरस्कारांसाठी लिखाण करतात. वाचकांसाठी लिहिण्याच्या प्रमाण फार कमी आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात वाचक संख्या कमी झाला असल्याचा सूर निघत असतो परंतु वस्तुस्थिती तशी नाही.  वाचक संख्या कमी झाली असती तर मी रावण हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याच्या दीड लाख प्रति खपल्या नसत्या. आता आपल्या सर्वांवर एक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे भाषा संवर्धनासाठी आपल्याला बालसाहित्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अमेरिकासारख्या देशाला कॉमिकच्या माध्यमातून सुपरहिरो तयार करावे लागले. आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज,  छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर  यांच्यासारखे दिग्गज लोक होते. त्यांच्यावर इंटरनॅशनल पध्दतीने साहित्य निर्माण झाले. तर पुढच्या पिढीची दृष्टीही इंटरनॅशनल होईल. मी रावण लिहिण्यापूर्वी राम-रावण यांच्या जीवनावर आधारित साडेसातशे पुस्तके चार वर्षात वाचली आणि त्यानंतर मी रावणावर पुस्तक लिहिले. मला प्रकाशन संस्था ही मिळाली नाही. मी स्वतःचीच प्रकाशन संस्था सुरू करून पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दीड लाख प्रति खपल्या, त्यानंतर मला काही जणांनी ट्रोल केले तर काही जणांनी कौतुक केले. मी रावण लिहिल्यानंतरही महाराष्ट्रात माझे कौतुक झाले, यातूनच मराठी माणसांचे मन किती मोठे आहे हे दिसून येते. आपले आपल्या पुस्तकांवर, आपल्या लिखाणावर प्रेम असेल तर सर्व काही साध्य करता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात मसाप पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी 14 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा साता-यात सुरू झाला. 14 वर्ष एखादा उपक्रम सुरू ठेवणे तोही मराठी भाषेचा ही एक आव्हानात्मक कामगिरी महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्याला सातारा नगरपालिकेने चांगले पाटबळ दिले. सातारा नगरपालिका मराठी साहित्यासाठी काम करणारी ही देशातील पहिली नगरपालिका आहे. साताऱ्यात साहित्य चळवळ सुरू राहावी यासाठी मसाप, पुणे शाहुपुरी शाखेची स्थापना केली. त्यानंतर या शाखेच्या कार्याची माहिती दिली.  अखिल भारतीय साहित्य संमेलन साता-यात व्हावे यासाठी अनेक निमंत्रण आली आहेत, पण हे 99 वे साहित्य संमेलन साता-यात व्हावे अशी मागणी केली आहे. ज्याप्रमाणे शाहुपुरी शाखेच्या कार्याचा राज्यात गौरव होत आहे त्याचप्रमाणे 99 वे संमेलन साता-यात झाले तर तेही साता-याच्या नावलौकिकाला साजेसे होईल असे सांगितले.

सूत्रसंचालन अमर बेंद्रे यांनी केले तर आभार चंद्रकांत बेबले यांनी मानले. याप्रसंगी डॉ.संदीप श्रोत्री,  डॉ. राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार,  सचिन सावंत,   सौ.ज्योती कुलकर्णी,  सौ. अश्विनी जठार, वजीर नदाफ, गुजराथी अर्बनचे व्यवस्थापक सतीश घोरपडे, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य, साहित्यप्रेमी आणि सातारकर उपस्थित होते.

Spread the love