। लोकजागर । लेख । दि. २ मार्च २०२५ ।
विद्यार्थी तथा तरुण मित्रांनो,
तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभर महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये या ठिकाणी ग्रंथालय भेट, सामूहिक ग्रंथ वाचन कार्यक्रम, वाचन कौशल्य कार्यशाळा, विद्यार्थी-लेखक परिसंवाद इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
असे कार्यक्रम राबवण्याची शासनाला आवश्यकता का वाटली?
आजचा समाज गोंधळलेला आहे. दिशाहीन अवस्थेत जगतो आहे. पोट, पैसा, प्रसिद्धी आणि पद यासाठीच धडपडतो आहे. अनाचार, स्वैराचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचार यांचे विषारी प्रदूषण वाढले आहे. समाज भौतिक सुखामुळे सुजलेला आहे आणि अंतरंगाने कीटका झाला आहे.

खरंच अलीकडे पुस्तकांचे वाचन कमी होत आहे असे दिसते. देशात विचारी व सदाचारी पिढ्या घडविण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची नितांत गरज आहे याची अनेक विचारवंतांना जाणीव झालेली आहे. शरीराचे पोषण करण्यासाठी जशी अन्नाची गरज असते, तसे माणसाला मनाचे, मेंदूचे पोषण करण्यासाठी बहुविध स्वरूपाच्या वाचनाची गरज असते. वाचनाने माणूस घडतो. जीवन उदात्त आणि उन्नत होण्यासाठी स्वहितकारी व समाजहितकारी वाचन आवश्यक असते.
जगात जे महापुरुष, विचारवंत, तत्वज्ञ होऊन गेलेत ते सर्व स्वकर्तृत्व, स्वसामर्थ्य, आत्मबल आणि आत्मविश्वास यांमुळे निर्माण झालेले आहेत. कर्तुत्वाला प्रेरणा देणारी शक्ती आणि ऊर्जा केवळ ज्ञानाने प्राप्त होते. आणि ज्ञान मिळविण्यासाठी ग्रंथ मोलाचे सहकार्य करतात.
उदाहरणच द्यायचे झाले तर मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवश्य उल्लेख करीन. त्यांचे ग्रंथांवर अतोनात प्रेम होते. ते खूप वाचन करायचे. ‘माझा समाज अज्ञानात झोपलेला आहे; त्यामुळे मला जागे राहावे लागत आहे’ असे ते म्हणत. हजारो पुस्तकांनी भरलेली कपाटे ही त्यांची धनसंपदा होती. स्वतःचे ‘राजगृह’ हे घर त्यांनी ‘ग्रंथालय’ बनविले. त्यांचे वाचन आणि ज्ञान यामुळेच ते जगातील ‘महामानव’ म्हणून ओळखले जातात. अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, नीतिशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदेपंडित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे सारे असून जागतिक कीर्तीचे ‘विद्वान’, ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून त्यांची जगात ओळख आहे.
वाचनाने महान झालेल्या जगभरच्या थोरांची फार मोठी यादी सांगता येईल.
विद्यार्थी तथा तरुण मित्रांनो, लक्षात ठेवा! वाचनाने माणूस ‘नराचा नारायण’ बनतो. पुस्तके आपणास आनंद देतात, मनोरंजन करतात, ज्ञान देतात, जीवन प्रगल्भ बनवतात, समृद्ध करतात, जगण्याला दिशा देतात. पुस्तक वाचन करणारा आणि न करणारा यांच्या जीवनातील आचार आणि विचारांमध्ये जमीन अस्मानचा फरक दिसून येतो. वाचनाची सवय विद्यार्थी दशेपासूनच लावून घेतली पाहिजे आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचे खूप वाचन केले पाहिजे.
तुम्ही म्हणाल कोणती पुस्तके वाचावीत?
पुस्तके अनेक प्रकारची आहेत. जीवनाला आकार देणारी – आणि जीवन बरबाद करणारी देखील!
मराठी साहित्याला समृद्ध, सशक्त आणि श्रीमंत करण्यामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महानगरीय साहित्याचे योगदानही नगण्य म्हणता येणार नाही.
यापूर्वी समाजातल्या सामान्य माणसाचे दुःख, दैन्य, दारिद्र्याने शापित आयुष्याचा आक्रोश साहित्यात आला नव्हता. दलित साहित्यात उच्चनीचता, जातीपातीने हिरावून घेतलेले ‘माणूसपण’ आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने दिलेली ‘झुंज’ याचे चित्रण येते; तर ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब दैन्य दारिद्र्याने पिचलेल्या माणसांना नायक बनवून साहित्य निर्मिती होत आहे. विशेषतः शेतकरी जीवन चित्रित होताना दिसून येते. स्त्रियांच्या मुक दुःखाला व आदिवासी, भटके यांच्या दुःखाला वेशीवर टांगण्याचे कार्यही लेखक करीत आहेत.
नेहमी चांगल्या ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन करावे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, अब्राहम लिंकन, बराक ओबामा, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अशा अनेक थोर पुरुषांची, संत महात्म्याची जीवनचरित्रे, महान कादंबऱ्या, चांगले कथासंग्रह, कवितासंग्रह, गाजलेली आत्मकथने यांचे वाचन करावे. त्यातून तुम्हास स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल. त्यांच्यासारखे आपणही मोठे व्हावे अशी अभिलाषा निर्माण होईल. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर राहिल्याने जीवनाला दिशा मिळेल. मोठं व्हायचं असेल, नाव कमवायचे असेल तर तीव्र इच्छाशक्तीबरोबर अथक परिश्रम करावे लागतात. तुम्हाला ज्ञानपीपासू बनायला हवे. ‘ज्ञान तेथे मान!’ हे ज्ञान पुस्तके देतात. म्हणून ते तुमचे खरे मित्र, खरे गुरु, खरे मार्गदर्शक आहेत.
वाचनापासून तुमचे मन परावृत्त करणारे, तुमचे मन भलतीकडेच आकर्षित करणारे महत्त्वाचे तीन घटक आहेत – टी.व्ही., संगणक आणि मोबाईल! या तिन्हींचाही आवश्यक तेवढाच वापर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनाला भुरळ पाडणाऱ्या मालिका पहात बसून जीवनातला महत्त्वपूर्ण वेळ बरबाद करत टीव्हीसमोर बसू नये. काय पाहावे आणि काय पाहू नये याचा विवेक करा. मोबाईलने तर इतके गारुड केले आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि गल्लोगल्ली मोबाईलची दुकाने थाटली आहेत. संगणक आणि मोबाईलचा कामापुरताच वापर करावा. तासनतास मोबाईलचा वापर करू नका. जगावं कसं?आणि कशासाठी? हे पुस्तके शिकवतात. म्हणून जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करा.
विद्यार्थ्यांना, तरुणांना वाचनाकडे प्रवृत्त करण्यासाठी शिक्षक, शाळा, पालक व ग्रामस्थ यांचीही महत्त्वाची भूमिका असते.
शिक्षक हा चांगला वाचक असावा. वर्गात धडा, कविता शिकवताना त्या लेखकाविषयी, त्यांच्या ग्रंथ संपदेविषयी तसेच त्या लेखकाचे समकालीन इतर लेखकांविषयी सखोल माहिती द्यायला हवी. म्हणजे विद्यार्थी संबंधित लेखकांची इतर पुस्तके ही वाचतील. वर्गात शास्त्रज्ञांचे, महान कर्तृत्ववान व्यक्तींचे, पाठ्यपुस्तकातील आणि इतर मान्यवर लेखकांचे फोटो लावावेत. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्याविषयी कुतूहलापोटी अधिक जाणून घेतील.
शाळेत वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणे इतर लेखकांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात. साहित्यिक व वक्त्यांच्या भाषणांचे आयोजन करावे. कपाटातील पुस्तके बाहेर काढून प्रदर्शने भरवावीत. विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवाणघेवाण करावी. वाचलेल्या पुस्तकांचा थोडक्यात सारांश व नोंदी ठेवण्याची त्यांना सवय लावावी. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, निबंध, लेख यासाठी ‘भित्तीपत्रक’ चालवावे.
पालकांनी आपल्या पाल्यांचे लाड पुरवत असताना बालसाहित्य व इतर पुस्तकेही पुरवावीत.
प्रत्येक गावात ग्रामदैवताचे मंदिर असते. यात्रा/जत्रा यावर खूप पैसा खर्च केला जातो. तसे एक सुसज्ज असे ग्रंथालय व वाचनालय असावे. त्यायोगे शालेय विद्यार्थी, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि शिकून बाहेर पडलेले तरुण यांची अभ्यासाची सोय होईल. त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल. ते अधिकारी बनतील. सुजाण नागरिक म्हणून जीवन जगतील. त्यामुळे गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
‘शाळा तेथे ग्रंथालय’ आहेच. तसेच ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा उपक्रम ही शासनाने राबवला आहे. ग्रंथालयांना चांगले अनुदानही मिळत आहे. मी तर म्हणेन जसे घरात ‘देवघर’ असते. तसे ‘घर तेथे छोटेसे ग्रंथालय’ असायला हवे. त्यामध्ये आपल्या आवडीची आणि उपयोगी पडतील अशी पुस्तके असावीत. म्हणजे आपल्या सवडीनुसार, गरजेनुसार त्यांचे वाचन करता येईल.
साहित्यातून लोकसंस्कृतीचे, प्रथा-परंपरा, सण, सोहळे, यात्रा, जत्रा याबरोबरच व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांचे परस्पर संबंध यांचे विविध पैलू व्यक्त होतात. समाज परिवर्तनासाठी, जीवनातील लढाई जाणून घेण्यासाठी कृतार्थ आणि परिपूर्ण जीवनप्राप्तीसाठी दर्जेदार साहित्य श्वासासारखे सोबतीला ठेवले पाहिजे.
आज समाजात ज्या विकृती निर्माण झाल्या आहेत, नैतिक मूल्यांचे अधःपतन होताना दिसत आहे; ते रिकामे डोके असल्याचे लक्षण आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही मूल्ये आचरणात आणण्यासाठी आणि महात्मा बुद्धाने सांगितल्याप्रमाणे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशा आचरणाची आवश्यकता विचारात घेऊन देशात विचारी आणि सदाचारी पिढ्या घडविण्यासाठी चांगले संस्कार देणारी पुस्तके शोधून वाचली पाहिजेत. त्यातच सर्वांचे हित आहे. म्हणूनच म्हटले जाते — पुस्तके वाचाल तर वाचाल.
प्रा. भास्कर बंगाळे, पंढरपूर
मो. ९८५०३७७४८१