पुढच्या पाच वर्षात तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज आणि नोकरीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील : रणजितसिंह नाईक निंबाळकर

। लोकजागर । फलटण । दि. ०६ मार्च २०२५ ।

‘‘फलटण तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज आणि नोकरी या समस्या पुढच्या पाच वर्षामध्ये सोडवण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत’’, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरातील दगडी चाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरतोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तसेच शिंदेवाडीचे माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी आपल्या सहकार्यांसमवेत काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत केल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर माध्यमांशी बोलत होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, ‘‘तरुण कार्यकर्त्यांचा सकारात्मक कामांसाठी भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. फलटण शहराची घडी आपल्याला बसवायची आहे. शहरातील लोकांच्या समस्यांच निवारण करायचं आहे. येणार्‍या अर्थसंकल्पात फलटण तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधीचा समावेश व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत.’’

‘‘नवीन रेव्हेन्यू क्लबसाठी निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच शहरात नवीन प्रशासकीय भवन होणार आहे. शहरातील रिंगरोड नव्याने आपण विकसित करणार आहोत. दहिवडीकडे जाणार्‍या रस्त्याचे सुशोभीकरण होणार आहे. सिटी हॉस्पिटलला आपण मंजूरी घेतलेली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून मोफत दवाखाना उपलब्ध होणार आहे. शॉपींग कॉम्प्लेक्स होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. महतपुरा पेठ येथे मिनी स्टेडिअम सुरु होणार आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डासाठी आपण निधी उपलब्ध करुन घेणार आहोत’’, असेही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Spread the love