। लोकजागर । लेख । दि. १९ मार्च २०२५ ।
होळीचा सण म्हणजे भारतात वसंत ऋतूची सुरुवात. फाल्गुन महिन्याच्या मध्यात हा सण येतो. तर त्यानंतर पाचव्या दिवशी येणारी पंचमी ‘रंगपंचमी’ म्हणून ओळखली जाते. भारतीय कालगणनेनुसार फाल्गुन महिन्यात हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते. तसेच, भारतीय नववर्ष चैत्र महिन्यात येत असल्याने होळी आणि रंगपंचमी हे सण एका प्रकारे नवे वर्ष साजरे करण्याचेच प्रतीक आहे.

केशवसुतांच्या कवितेप्रमाणे –
“जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका” ही भावना या सणामागे असू शकते.
पुराणकथांमधील संदर्भ
होळी आणि रंगपंचमी या सणांचे पुराणांमध्ये महत्त्वपूर्ण संदर्भ आढळतात. फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवली जाते, तेव्हा मदन (कामदेव) यांचा दाह करण्यात आला, अशी कथा आहे. यानंतर, रतीने आपल्या पतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी महादेवाची प्रार्थना केली. महादेवाने तिची प्रार्थना स्वीकारून पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी, म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी, मदनाला पुनरुज्जीवित केले.
त्यामुळे भारतात वसंत पंचमीला सरस्वती आणि रती-मदनाची पूजा केली जाते आणि वसंतोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाचा काही भाग आणि मध्य प्रदेशात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तर उत्तर भारतात यालाच ‘वसंत पंचमी’ म्हणतात.
इतिहासातील संदर्भ
रंगपंचमीचा उल्लेख धर्मसिंधू ग्रंथात (लेखक: काशीनाथ शास्त्री उपाध्ये) आढळतो.
त्यात म्हटले आहे की –
“फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभ सुरू होतो… द्वितीयापासून वद्य पंचमीपर्यंत शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का उधळून प्राकृत लोक हा सण साजरा करतात.”
‘प्राकृत लोक’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्री प्राकृत भाषा बोलणारी लोक, असे अभिप्रेत असावे. सातवाहन काळापासून यादव काळापर्यंत महाराष्ट्राचा मोठा भूभाग महाराष्ट्री प्राकृत भाषिक होता.
सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ऐतिहासिक दस्तऐवजांमध्येही रंगपंचमीचा उल्लेख आढळतो. पूर्वी नववधूच्या पहिल्या वर्षी सासरकडून १२ सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. त्यामध्ये रंगपंचमीचाही समावेश होता. त्या दिवशी नववधूला सासरकडून केशरी रंग उधळलेली नवी साडी देण्याची परंपरा होती.
शहाजी महाराज आणि जिजाऊ माँ साहेब यांच्याशी संबंधित उल्लेख
रंगपंचमीचा आणखी एक महत्त्वाचा उल्लेख जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराज यांच्याशी संबंधित आहे.
सिंदखेड येथे लखोजी जाधवांच्या वाड्यात रंगपंचमीच्या दिवशी, वेरूळचे मालोजीराजे भोसले आपल्या पाच वर्षांच्या शहाजी महाराजांसह आले होते. त्यावेळी लहान जिजाऊंनी शहाजी महाराजांच्या अंगावर गुलाल उधळला. पुढील इतिहास सर्वांना माहीतच आहे!
रंगपंचमी – आपला मराठी माणसांच्या रंगाचा सण
मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी व आमचे मार्गदर्शक प्रा. डॉ. जयद्रत जाधव सरांनी Jaydrath Jadhav ‘रंगपंचमी आपला सण नाही’ असे मत व्यक्त केले. त्यामुळे अधिकाधिक लोकांना हा ऐतिहासिक संदर्भ समजावा, म्हणून हा लेख लिहिला आहे.
यावर्षी (२०२५) रंगपंचमी १९ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
यापेक्षा वेगळे संदर्भ कोणाकडे असल्यास कृपया कळवावेत. आपले स्वागत आहे!
@ युवराज पाटील चोबळीकर