वन विभाग व ग्लोबल अर्थ फाऊंडेशनचा उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. २० मार्च २०२५ ।
दि. २१ मार्च जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वन विभाग, सातारा, वन परिक्षेत्र, फलटण व ग्लोबल अर्थ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे वन वणवा परिसंवाद संमेलन व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २१ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता येथील नवलबाई मंगल कार्यालयात (मारवाड पेठ) आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज व सामाजिक वनिकरणचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक रो.ह.यो. वन्यजीव दिगंबर जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून वन वणवा परिसंवाद संमेलनाचे अध्यक्षपदी कवी हनुमंत चांदगुडे हे भूषविणार आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी, फलटण सचिन रघतवान हे या कार्यक्रमाचे संयोजक असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियतक्षेत्र वनअधिकारी, फलटण राहुल निकम हे करणार आहेत.
दरम्यान, जागतिक वनदिनाचे औचित्य साधून वन्यजीवांचे संरक्षण, वनसंपत्तीचे संवर्धन व वनवणवा विषयी प्रभावी जनजागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.