डी. पी. चोरी रोखण्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तालुक्यातील आठ गावांची बैठक संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. २० मार्च २०२५ ।
‘‘पोलीस यंत्रणा कमी असलेने व दुर्गम भागातील डी. पी. लोकेशन पोलीसांना माहित नसल्याने रात्री ते सापडत नाही. यासाठी महावितरण व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले तर नक्की डी. पी. चोरी थांबेल. फक्त याबाबत सर्वांनी संवेदनशील राहणे गरजेेचे आहे, असे आवाहन डी. पी. चोरी बाधीत गावांना बैठकीद्वारे केले आहे’’, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.

ग्रामीण भागात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडत असून याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रान्सफॉर्मर चोरी प्रतिबंधासाठी फलटण तालुक्यातील भिलकटी, कांबळेश्वर, वडजल, वाठार निंबाळकर, निंभोरे, सुरवाडी, फडतरवाडी, काशीदवाडी या आठ गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांची बैठक पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी आयोजित केली होती. सदर बैठकीबाबतची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी माध्यमांना दिली.
‘‘ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत जर डीपी ट्रिप होऊन रात्री परत चालू झाला तर हे सब स्टेशनला समजते. त्यांनी जर त्यावेळी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणा हेल्प लाइन वरून कॉल दिला तर ग्रामस्थांना कॉल जाईल व डीपी चोर पकडले जाऊ शकतात. या प्रकारे गत एक महिन्यापासून पोलिसांनी कारवाई केली असता डीपी चोरीत घट दिसून आली आहे. परंतु काही गावे ही यंत्रणा राबविण्यास अनुत्साही आहेत. त्यामुळे त्यांच्या समुपदेशनासाठी ही बैठक बोलावली होती. तालुक्यातील सदरची गावे डीपी चोरी बाधित असून तालुक्यातील अशा घटनांपैकी 80 टक्के घटना या गावांमधील आहेत’’, असेही पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी स्पष्ट केले.
‘‘डी.पी. चोरीच्या सर्वात जास्त घटना भिलकटी, वडजल, सुरवडी गावात असूनसुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासन बैठकीस अनुपस्थित होते. महावितरण सुद्धा डीपी चोरी उपाय योजनांबाबत संवेदनशील दिसून येत नाही. ग्रामसुरक्षा यंत्रणेशी संपर्क करून सब स्टेशनचे ऑपरेटरचे नंबर या यंत्रणेत घेणे बाबत पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे त्यांनी नंबर घेतले होते. परंतु पुढे समन्वय न झालेने ते सुद्धा नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेने काढून टाकले आहेत. त्यामुळे या बैठकीत ग्रामसुरक्षा यंत्रणा, महावितरण व गावकरी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला’’, असल्याचेही पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.