फलटण – कोेरेगांव विधानसभा मतदारसंघातील वीज, पाणी, आरोग्याच्या प्रश्‍नावरआमदार सचिन पाटील यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

। लोकजागर । फलटण । दि. २१ मार्च २०२५ ।

विधानभवन, मुंबई येथे सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा, उत्तर कोरेगांवमधील पाण्यासाठी वसना उपसा सिंचन योजना, यासह झिरपवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित करुन यासर्व कामांसाठी निधीची मागणी आमदार सचिन पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

झिरपवाडी ग्रामीण रुग्णालयाची पुर्नबांधणी करुन रुग्णालय सुरु करावे

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्‍नावर विधानसभेत बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, ‘‘झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय गेली 30 वर्षापूर्वी बांधून झालं आहे. पण बांधकाम होऊनसुद्धा तत्कालिन राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्या इमारतीचं उद्घाटनही झालेलं नाही. तिथल्या इमारती आता पडायला आल्या आहेत. फलटण भागात मजूर, शेतकरी यांची लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाची गरज असून तिथे उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देवून या इमारतीच्या पुर्नबांधणीसाठी राज्य सरकारने आवश्यक त्या निधीची तरतूद करावी.’’

दुर्गम भागात 11 के. व्ही. चे फीडर बसवावेत

ऊर्जा विभागासंदर्भातल्या मागण्या मांडताना आमदार सचिन पाटील म्हणाले, ‘‘फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांना गावठाण वाहीनीवरुन 22 के.व्ही. च्या फीडरवरुन वीजपुरवठा होत असतो. परंतु 22 के.व्ही. चे फीडर हे कॉपरचे असल्यामुळे ते चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. एक फीडर चोरीला गेला तर कमीत कमी 1 महिना तिथे फिडर बसत नाही. यातून शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होतं. शेतकर्‍याचं उभं पिक जळून जातं. त्यामुळे तिथे 11 के. व्ही. चे फीडर बसवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत प्रकल्प अहवाल तयार असून निधीअभावी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी या कामासाठी निधी मंजूर करावा.’’

ऊर्जा विभागाच्या आर.डी.एस.एस. स्कीमचा (सुधारीत वितरण क्षेत्र योजना) लाभ छोट्या वाड्यावस्त्यांनाही द्यावा

‘‘फलटण तालुक्यातसध्या आर.डी.एस.एस. फीडर सेपरेशन योजनेचे काम सुरु असून त्याद्वारे वाड्यावस्त्यांना गावठाण वाहीनीवरुन 24 तास वीज पुरवठा करण्याचे प्रयोजन आहे. परंतु 20 पेक्षा कमी लोकसंख्या असणारी घरे असलेल्या वाड्यावस्त्यांवर या योजनेचा लाभ देता येत नसल्यामुळे हे नागरिक या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तरी दुर्गम भागातील लोकांना या योजनेचा लाभ व्हावा. यासाठी अतिरिक्त 35 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. सदर निधी शासनाने उपलब्ध करुन द्यावा’’, अशी मागणीही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

उत्तर – कोरेगांवसाठी वसना – उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी

‘‘फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगांव मधील 26 गावे पाण्यापासून वंचित आहेत. या भागात कायम दुष्काळ आहे. शेतकर्‍यांना चांगली शेती असून चांगले उत्पन्न घेता येत नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न आहे. याठिकाणी 0.52 टी.एम.सी. पाणी आपण मंजूर करुन घेतलेलं आहे परंतू पाण्याची सिंचन योजना या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे या गावांना पाणी देवून द्याय देण्यासाठी वसना – उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. यासाठी आवश्यक तो निधी सरकारने उपलब्ध करुन द्यावा’’, अशी मागणीही आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत बोलताना केली.

शहरी भागात अंडरग्राउंड वायरिंग व्हावे

“मतदारसंघातील शहरी भागात असलेले ओव्हरहेड वायरिंग झाडांमुळे, अति पर्जन्यवृष्टीमुळे, वादळी वार्‍यांमुळे अशा विविध कारणास्तव नादुरुस्त होत असते. नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अंडरग्राऊंड वायरिंग करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच जीआयस सबस्टेशन उभारण्याचीही नितांत आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असलेले प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहेत. तरी या प्रस्तावांना मंजूरी व आवश्यकता तो निधी उपलब्ध करुन द्यावा:, अशी मागणीही आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत बोलताना केली आहे.

अन्न – धान्य वितरणाची उत्पन्न अट बदलावी

“शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ मिळवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने उत्पन्नाची अट घालून दिलेली आहे. शहरातील भागातील नागरिकांसाठी 59 हजार, ग्रामीण भागासाठी 44 हजार अशी वार्षिक उत्पन्नाची अट आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता अधिकाधिक सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या उत्पन्नाच्या मर्यादेत बदल करण्याची आवश्यकता असून तसा प्रस्ताव शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा”, अशी मागणीही आमदार सचिन पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

Spread the love