कोळकीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेबाबत बैठक संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ ।

कोळकीचा पाणी प्रश्‍न सोडवण्याच्या अनुषंगाने नवीन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात अधिकारी व पदाधिकार्‍यांची बैठक कोळकी (ता.फलटण) येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. सदर बैठकीस स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे, गिरवी प्रादेशिक योजनेचे अध्यक्ष महादेवराव गुंजवटे, कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर, युवा नेते संजय देशमुख यांच्यासह महाराष्ट्र जलजीवन पाणीपुरवठा प्राधिकरण, महावितरण, महसूल आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीबाबत माहिती देताना जयकुमार शिंदे यांनी सांगितले की, कोळकीत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या भाजप प्रवेशावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोळकीचा पाणी प्रश्‍न निकाली काढणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याचबरोबर कोळकीच्या विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या होत्या. याबाबतच्या कार्यवाहीचा एक भाग म्हणून सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सन 2054 सालापर्यंत गावाला कशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था करता येईल व साधारण किती लिटर पाणी लागेल? कोळकी ला रोज शुद्ध पाणी कसे देता येईल? जागेची उपलब्धता कशी करता येईल? या दृष्टीने अभिजित नाईक निंबाळकर यांनी सूचना केल्या. कोळकी गावासाठी 3 एकर जागेमध्ये नवीन वाढीव पाणी पुरवठा टँक, तसेच लाईटबील कमी येण्यासाठी त्यावर अत्याधुनिक पद्धतीची सोलर सिस्टीम बसवणे याबाबत सविस्तर चर्चा झाली, असल्याचेही जयकुमार शिंदे यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान, गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या लाईट बीलाचा प्रश्‍न व गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सोलरच्या आधारे राबवल्यास या योजनेअंतर्गत येणार्‍या गावांना त्याचा फायदा होईल याबाबतची चर्चा झाली; त्यावेळी, या योजनेसंबंधी सोलर विषयक अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच या योजनेचे लाईट बील शासनाकडून माफ होणेकामी आमदार सचिन पाटील शासनस्तरावर प्रयत्न करत आहेत, असे निदर्शनास आणून दिले असल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीच्या आयोजनातून कोळकीच्या विकासासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट होत असल्याने याबद्दल सचिन रणवरे व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

Spread the love