। लोकजागर । फलटण । दि. ०९ एप्रिल २०२५ ।
शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी येतात. फलटणमध्ये सकाळी कावडी येताच भाविकांतर्फे या कावडींचे यथोचित स्वागत करण्यात आले. कावडीच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते.

सुमारे १२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेला गुढी पाडव्यापासून सुरुवात झाली असून या यात्रेनिमित्त फलटण येथून शिखर शिंगणापूरकडे जाणार्या या सर्व मानाच्या कावडी आपापल्या नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने शंभू महादेवाच्या पायथ्याशी मुंगीघाटाकडे मार्गस्थ झाल्या. काल फलटण शहरात या कावडींचे आगमन होताच फलटणमधील भाविकांनी या कावडींचे व त्यासोबत असणार्या मानकर्यांचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडी सोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुतार्या आणि हरहर महादेवाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान, सासवड (जि. पुणे) येथील भुतोजीबुवा तेली या कावडीचे व त्यासोबत असणार्या मानकर्यांचे स्वागत व पूजन झाले. या कावडीचे फलटण शहरात आगमन झाल्यानंतर जिंती नाका येथे आमदार सचिन पाटील यांनी स्वागत केले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. फलटण प्रशासनाच्या वतीने या कावडीचे व त्यासोबत असणार्या मानकर्यांचे स्वागत फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, मंडलाधिकारी शीलवंत चव्हाण, तलाठी सोमनाथ पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
