। लोकजागर । सातारा । दि. २९ एप्रिल २०२५ ।
भारतीय संस्कृतीत विवाह ही महत्वाचा आणि सार्वत्रिक संस्कार आहे. याकरीता शुभमुहुर्तावर विवाह विधी आयोजित करण्यात येतात. “अक्षय तृतीया” या मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

बालविवाह करणऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विवाहाशी संबंधित सेवा पुरवठाधारक (उदा. धार्मिक पुजारी, प्रिंटीग प्रेसचे मालक, मंडपवाला, विवाह हॉलचे व्यवस्थापक, केटरर्स, संगीत बँड आणि सजावट करणारे इ.) यांनी विवाहापुर्वी मुलाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण असलेबाबतचा वयाचा पुरावा घेऊन तशी वयाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा बाल विवाह घडल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांवरही सदर बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी, सातारा यांनी दिलेले आहेत.
मागील वर्षभरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन कक्षाने 22 बालविवाह रोखले असून 3 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16(1) नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरीकांना बाल विवाह निदर्शनास ग्रामस्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना माहिती द्यावी किंवा बाल बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रंमाक १०९८ अथवा ११२ या क्रमांकावर माहिती नोंदवावी . माहीती ही गोपणीय ठेवली जाईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.