फलटणचा कायापालट! ‘टोईंग व्हॅन’पूर्वी पार्किंगचे पट्टे ओढा आणि हायटेक स्वच्छतागृहे उभारा; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रशासनाला ‘अल्टिमेटम’

। लोकजागर । फलटण । दि. ३१ डिसेंबर २०२५ ।

फलटण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि बेशिस्त पार्किंगला चाप लावण्यासाठी नगरपरिषदेने आता कठोर पाऊल उचलले आहे. शहरात लवकरच ‘टोईंग व्हॅन’ सेवा सुरू करण्यात येणार असून, त्याबाबत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. फलटण नगरपरिषद, शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय परिवहन कार्यालय (RTO) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी त्यांना पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे आणि रस्त्यांवर शिस्तबद्ध पांढरे पट्टे आखून देणे बंधनकारक असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत पार्किंग झोन निश्चित होत नाहीत आणि त्याबाबत पुरेसी जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत टोईंग व्हॅन सुरू करू नये, असा स्पष्ट रोडमॅप त्यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव, आरटीओ अधिकारी श्री. लेंभे आणि नगरसेवक रोहित नागटिळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला.

वाहतुकीच्या शिस्तीसोबतच शहरातील सार्वजनिक स्वच्छतेबाबतही नगराध्यक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. फलटण शहरात कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय आता कायमची थांबणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये ‘सुलभ शौचालय’च्या धर्तीवर ‘पे अँड युज’ तत्त्वावर अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही स्वच्छतागृहे अत्यंत स्वच्छ आणि हायजीनिक असावीत, जेणेकरून तिथे जाणाऱ्या नागरिकाला घाण किंवा किळस वाटणार नाही, अशी सक्त ताकीद समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आरोग्य आणि बांधकाम विभागाला दिली आहे. भविष्यातील तोडफोड टाळण्यासाठी पाश्चिमात्य भांड्यांऐवजी पक्के भारतीय पद्धतीचे बांधकाम आणि प्लास्टिकच्या टाक्यांऐवजी आरसीसी टाक्यांचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शहराच्या या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे आश्वासनही नगराध्यक्षांनी दिले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून भरीव निधी आणला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे खंबीर पाठबळ आपल्या पाठीशी असून प्रशासनाने केवळ कामाचे दर्जेदार नियोजन करून ते तातडीने अंमलात आणावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. नगराध्यक्षांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे फलटण शहर येणाऱ्या काळात अधिक स्वच्छ आणि शिस्तबद्ध होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Spread the love