। लोकजागर । फलटण । दि. ४ जानेवारी २०२६ ।
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ‘फलटण विकास आघाडी’ अधिकृतपणे उतरली आहे. केवळ घोषणा नव्हे, तर सर्वसमावेशक विकासाचा ठोस आराखडा घेऊन आघाडीने निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, पाणी, शेती, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तालुक्याचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी फलटण विकास आघाडीने आपला वचननामा जाहीर केला असून, यामध्ये सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवले आहे.
कागदोपत्री १००% ओलिताचा फुगा फोडणार; पाणी नियोजनावर भर
फलटण तालुका कागदोपत्री १००% ओलिताखाली दिसत असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारे पाण्याचे आवर्तन अतिशय तुटपुंजे आहे. या वास्तवावर बोट ठेवत आघाडीने पाण्याचे योग्य नियोजन हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. कालवा लाभ क्षेत्रातील पाण्याचे वाटप, नळ पाणी योजना, जलसंधारण, पाझर तलाव आणि शेततळ्यांच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आघाडीने सोडला आहे.
शेती, आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणार
ग्रामीण भागातील मोडकळीस आलेले रस्ते आणि शेत रस्ते दुरुस्त करण्यासोबतच, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यावर आघाडीचा भर असेल. जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, अंगणवाडी सक्षमीकरण आणि माता-बाल आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी
महिला बचत गटांना केवळ कागदावर न ठेवता त्यांना प्रत्यक्ष आर्थिक बळ देणे आणि ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा आघाडीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचा भाग आहे.
काय म्हणाले आघाडीचे प्रतिनिधी?
“फलटण तालुक्याचा विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीतून दाखवण्याचा आमचा संकल्प आहे. मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.” — जयदीपादित्य शिंदे (प्रतिनिधी, फलटण विकास आघाडी)
“गावागावातील समस्यांची आम्हाला जाण आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर प्रभावी प्रतिनिधित्व करून सरकारी निधी आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी फलटण विकास आघाडी हा सक्षम पर्याय आहे.” — शुभम जाधव (प्रतिनिधी, फलटण विकास आघाडी)
फलटण विकास आघाडीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तालुक्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिले असून, ही निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
