सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाच्या वतीने मुलींसाठी विशेष मार्गदर्शन सोहळा संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. ११ जानेवारी २०२६ ।
“मुलींचे शिक्षण ही प्रगतीची पहिली पायरी आहे. मात्र, शिक्षण घेत असताना मुलींना अनेक आव्हानांना आणि समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः आजच्या डिजिटल युगात फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम प्रकरणाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुलींनी या धोक्यांपासून सावध राहून मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक प्रगतीसाठीच करावा,” असे कळकळीचे आवाहन फलटण पोलीस निर्भया पथकाच्या संध्या वलेकर यांनी केले.
सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, फलटण यांच्या वतीने १० जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे ‘निर्भया पथक’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
संध्या वलेकर यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली. समाजात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचे दाखले देत त्यांनी मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले. सेवा भारतीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या विधायक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी सेवा भारती प्रकल्पाचे प्रमुख श्री. पोपट बर्गे आणि शिंदेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज युवक संघाचे अध्यक्ष श्री. सचिनभैय्या भगत यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जगताप सर यांनी पोलीस हवालदार अजितकुमार यादव, निर्भया पथकाच्या संध्या वलेकर, पूनम तांबे आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात श्री. योगेश ढेकळे यांनी सेवा भारतीच्या फलटण तालुक्यातील सेवाकार्याचा आढावा घेतला. याच प्रसंगी श्री. स्वानंद जोशी यांनी फलटणमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या ‘संगणक प्रयोगशाळे’बद्दल महत्त्वाची माहिती दिली. कॉमर्स शाखेत शिकणाऱ्या शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा मोठा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या किल्ले स्पर्धेतील विजेत्या मुलांचा बक्षीस वितरण सोहळाही संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. घोरपडे यांनी सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प आणि निर्भया पथकाचे आभार मानले.
या सोहळ्याला रा.स्व.संघाचे तालुका प्रचार प्रमुख श्री. बापू टकले, पोलीस पाटील श्री. अविनाश धुमाळ इनामदार, शिक्षण कमिटी सदस्य श्री. राहुल शिंदे, शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि ११२ विद्यार्थी असे एकूण १३४ जण उपस्थित होते.
