। लोकजागर । फलटण । शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ ।
फलटण शहरातील करदात्या नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडून अक्षरशः लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, चालू थकबाकीवर आकारण्यात येणारा २% दंड तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला खरमरीत निवेदन दिले असून, प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नगरपरिषद प्रशासनाने मालमत्ता कराच्या चालू थकबाकीवर २% दंड आकारणी सुरू केली आहे. नियमानुसार, कराची पावती फाटल्यानंतर ९० दिवस पूर्ण होताच दंड आकारला जातो. मात्र, प्रत्यक्षात करदात्यांना या पावत्या वेळेवर मिळतच नाहीत, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक नागरिकांना कर भरण्याच्या पावत्या मुदत संपण्याच्या अवघ्या काही दिवस आधी किंवा मुदत संपल्यानंतर मिळतात. नगरपरिषदेच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. “प्रशासनाच्या चुकीचा फटका करदात्यांनी का सोसायचा?” असा रोकठोक सवाल खानविलकर यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे दंड वसुलीत तत्परता दाखवणारे प्रशासन शहरातील मूलभूत सुविधांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची टीकाही खानविलकर यांनी केली. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. “नागरिकांना किमान सोयी-सुविधा देण्यात अपयशी ठरलेले प्रशासन दंड वसुलीसाठी मात्र सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे, ही शुद्ध लूट आहे,” असे प्रीतसिंह खानविलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बोलताना खानविलकर म्हणाले की, “करदात्यांना वेळेवर पावत्या न देता दंड आकारणे हा अन्यायकारक प्रकार आहे. नगरपरिषदेने आपला हलगर्जीपणा सुधारावा आणि चालू थकबाकीवरील २% दंड तात्काळ मागे घ्यावा. प्रशासनाने हा निर्णय बदलला नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”
आता या इशाऱ्यानंतर फलटण नगरपरिषद प्रशासन नमती भूमिका घेणार की दंड वसुलीचा अट्टाहास कायम ठेवणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
