फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या घरकुल, रेशनिंग आणि संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
। लोकजागर । फलटण । २४ मार्च २०२६ ।
फलटण येथील तहसील कार्यालयामध्ये प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुमारे दोन तास जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून, ज्या दिव्यांग व्यक्तींकडे घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही, अशांचे प्रस्ताव तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे येणाऱ्या अडचणींवरही यावेळी तोडगा काढण्यात आला. तहसीलदारांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून नवीन कर्मचाऱ्यांची मागणी करण्याचे मान्य केले आहे, तोपर्यंत कार्यालयातील विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदभार सोपवून कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रेशनिंग धान्य मिळण्याबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत, पुरवठा विभागाने संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा केला आहे. तसेच जे रेशन दुकानदार जाणूनबुजून महिन्याच्या शेवटच्या दिवशी धान्य देतात किंवा पावत्या देत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने संघटनेला लेखी आश्वासन दिले असून, तालुक्यातील प्रत्येक रास्त भाव दुकानात दिव्यांगांना प्राधान्याने धान्य देणे, बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. दिव्यांग बांधवांना धान्य मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रारींसाठी ८०८७०३९७२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या ठोस लेखी आश्वासनानंतर प्रहार दिव्यांग संघटनेने आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.
