मंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार; कोळकीच्या ‘हॉटेल दुर्वांकुर’मध्ये ना. भरतशेठ गोगावले यांनी घेतला जेवणाचा आस्वाद

सर्व शासकीय ‘प्रोटोकॉल’ बाजूला ठेवत मंत्र्यांनी जपला साधेपणा

। लोकजागर । फलटण । १३ एप्रिल २०२६ ।

राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्या साधेपणाचा प्रत्यय रविवारी फलटणकरांना आला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि शासकीय लवाजम्याचा बडेजाव न मिरवता त्यांनी फलटण तालुक्यातील कोळकी येथील ‘हॉटेल दुर्वांकुर’ला भेट दिली. मंत्र्यांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत थेट एका सामान्य ग्राहकाप्रमाणे हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेतल्याने तेथील उपस्थित नागरिक आणि हॉटेल व्यवस्थापन अवाक् झाले.

राज्याचे कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे अचानक आपल्या शहरात एका साध्या हॉटेलमध्ये आल्याचे पाहून अनेकांसाठी हा सुखद धक्का होता. ना. गोगावले यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासून ते जेवण संपेपर्यंत अत्यंत साधेपणा जपला. त्यांच्या या ‘कॉमन मॅन’ अवतारामुळे फलटण तालुक्यात त्यांच्या कार्यशैलीची आणि जनसंपर्काची जोरदार चर्चा रंगली आहे.

नागरिकांसोबत साधला संवाद आणि दिले फोटो:
एक महत्त्वाचे पद भूषवणारे मंत्री आपल्याच बाजूला बसून जेवण करत आहेत, हे पाहून हॉटेलमधील ग्राहकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे, भरतशेठ गोगावले यांनी कोणालाही निराश न करता अत्यंत हसतमुखाने प्रत्येकासोबत मनमोकळेपणाने फोटो काढू दिले. नागरिकांशी संवाद साधतानाही त्यांच्यात कोणताही शासकीय रुबाब जाणवला नाही.

कॅबिनेट मंत्री असूनही सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याच्या आणि साधेपणाने वागण्याच्या त्यांच्या या वृत्तीचे फलटण परिसरात कौतुक होत आहे. राजकारणातील मोठे पद असूनही पाय जमिनीवर असणारा नेता, अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या या भेटीचे स्वागत केले.

Spread the love