एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाड्यात १० टक्के वाढ

१५ एप्रिल ते १५ जून दरम्यान परिवर्तनशील भाडेदर लागू; प्रवाशांना प्रति तिकीट २ रुपये स्वच्छता अधिभारही मोजावा लागणार.

। लोकजागर । सातारा । १३ एप्रिल २०२६ ।

उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तात्पुरती भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘परिवर्तनशील भाडे आकारणी’ धोरणानुसार साध्या, जलद आणि रात्रसेवा साधारण बसेसच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.

एसटीच्या सातारा विभाग नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ तिकीट दरातच वाढ करण्यात आली नसून, प्रत्येक प्रवाशाकडून आता २ रुपये जादा ‘स्वच्छता अधिभार’ (Cleanliness Cess) देखील वसूल केला जाणार आहे. वाढत्या गर्दीच्या काळात बसस्थानके आणि बसमधील स्वच्छता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आगाऊ आरक्षण करणाऱ्यांनाही भरावा लागणार फरक: ज्या प्रवाशांनी १५ एप्रिलनंतरच्या प्रवासासाठी आधीच आगाऊ आरक्षण (Advance Booking) केले आहे, त्यांनाही या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. अशा प्रवाशांकडून प्रवास करतेवेळी जुन्या दराचे तिकीट आणि नवीन सुधारित दर यातील फरकाची रक्कम कंडक्टरमार्फत वसूल केली जाणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागणार आहे.

Spread the love