‘माझं कवितांचा गाव जकातवाडी’ संस्थेच्या गोखळी शाखेचे उद्घाटन
। लोकजागर । फलटण । ‘‘अध्यात्म जागृत ठेवले तर आपली प्रगती नक्की होते. त्यामुळे साहित्यालाही अध्यात्माची किनार असेल तर साहित्याची वाटचाल पुढे जाईल’’, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
माझं कवितांचा गाव जकातवाडी येथील संस्थेच्या ‘गाव तेथे संस्था’ या उपक्रमातील गोखळी (ता.फलटण) शाखेचा शुभारंभ संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन बेडकिहाळ बोलत होते. यावेळी मुख्य संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य प्रल्हाद पारटे, उपाध्यक्ष विश्वास नेरकर, कार्याध्यक्षा सुषमा आलेकरी, सचिव वसुंधरा निकम यांच्यासह स्वागताध्यक्ष नंदकुमार गावडे, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह ताराचंद आवळे, पत्रकार विकास शिंदे, लीना पोटे यांची उपस्थिती होती.
रविंद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले,‘‘ मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. साहित्यिक म्हणून आपल्याला कोणताही ‘पक्ष’ नको, तुम्ही सर्व ‘अक्षर पक्षी’ व्हा ! आज पत्रकार बांधवांना संसदभवन, विधानसभाचे दरवाजे बंद केले जात आहेत. देशाचा चौथा स्तंभ दिशाहीन झाला आहे. साहित्याला दिशा पाठबळ देणारेच हवालदिल झालेले दिसतात. अशा काळात साहित्यिकांनी सैरभैर न होता साहित्यिक संस्था वाढाव्यात’’, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
बजरंग गावडे म्हणाले, ‘‘वाचन संस्कृती वाढली पाहिजे. गावोगावी अशा संस्था समाज विचारांची देवाणघेवाण करतात ही गोष्ट अभिमानाची आहे.
ज्येष्ठ कविवर्य प्रल्हाद पारटे म्हणाले, ‘‘प्रथम आपण घरोघरी मराठी बोलले पाहिजे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. वाचन, मनन, चिंतन संस्कृती वाढली तरच गावोगावी अशी साहित्य सेवा करणारी मंडळी भेटतात. जनमाणसात गेले तरच कवितेचे महत्त्व वाढेल. समाज घडविण्यासाठी लेखन केले पाहिजे. कविता ऐकून वाचून आपण कवी व्हा. जोपर्यंत माझं कवितांचं गावं जकातवाडी राजधानी सातारा होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही; असा पण मी केला आहे’’ असेही प्रकाश पारटे यांनी सांगितले.
या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन शाहीर कवी प्रमोद जगताप यांनी बहारदार दमदार आवाजात शीघ्रशैलीत पार पाडले.
दुसर्या सत्रात कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे लीना पोटे, सुषमा आलेकरी, वसुंधरा निकम, ह.भ.प शुभांगी जाधव, स्नेहल काळे, प्रिया जगताप, प्रल्हाद पारटे यांच्या साक्षीने फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर करुन नियुक्ती पत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
नूतन कार्यकारिणी याप्रमाणे – अध्यक्ष -प्रमोद जगताप, उपाध्यक्ष – गुड्डाराज नामदास, उपाध्यक्ष – अॅड. आकाश आढाव, सचिव – अविनाश चव्हाण, संचालक – प्रकाश सकुंडे, ज.तु.गार्डे, भाग्यश्री खुटाळे, स्नेहल काळे, राजेश माने, अस्मिता खोपडे, सुशिल गायकवाड, दामिनी ठिगळे .