। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।
‘‘रेड कुणी टाकायला लावली का? हे काही मला माहिती नाही पण लोकांना वाटतंय ती कुणीतरी टाकायलाच लावली. आपल्या तालुक्यात कुणावरच अशी रेड झाली नव्हती. ती संजीवराजेंवरच झाली. इथंही प्रथम आम्हीच आहोत. उलट माझ्यावरच रेड टाकली असती तर माझा स्टेटस वाढला असता’’, असा उपरोधिक टोला आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.
आंदरुड (ता.फलटण) येथे युवा नेते शंभूराज विनायक पाटील यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टी कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

‘‘सत्ता नसली तर कार्यकर्ते जे टिकतात ते खरे कार्यकर्ते असतात. आपल्याकडं सत्ता उपभोगून काही कार्यकर्ते आता तिकडं गेलेले आहेत. त्यांनी त्यांची दिशा पकडलेली आहे. तुम्ही आता त्यांच नावही काढू नका आणि आपली दिशा पकडा. १९९१ पूर्वी तालुक्यातील राजकारणात विकास आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू न मानता सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती. सत्ता आपल्याला कशी मिळेल यासाठी कार्यकर्त्यांच्यात भांडण, गावागावात भांडण असे प्रकार सुरु होते. नातं विसरुन एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला लोक जात नव्हते. ही परिस्थिती थांबवण्यासाठी आपण राजकारणात पडलो. त्यानंतर आपण तालुक्यात विकास केला, संस्कृती आणली, शांतता आणली’’, असे नमूद करुन ‘‘आता आपण वयाने थकलो असलो तरी आपलं डोकं चालतंय, त्यामुळं तुम्ही काळजी करु नका खुर्चीत बसून संपवीन’’, असा इशाराही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला.
‘‘तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही तालुक्यात काम करु शकलो तो विश्वास तुम्ही घालवू नका. आपण कामाला कमी पडलो नाही; मत मिळवायला कमी पडलोय. राज्यातले दोन मोठे पक्ष आपल्या विरोधात होते. तालुक्याचे प्रश्न पेलणारा माणूस तुम्हाला दिसतोय कां? आणि हे जर त्यांना पेलणार नसेल तर तालुक्याचे बारा वाजायला किती वेळ लागणारे?’’, असा प्रश्नही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी उपस्थित केला.