। लोकजागर । फलटण । दि. २० मार्च २०२५ ।
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह यांच्या सहकार्याने फलटण बाजार समिती आवारातील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे ‘देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये गो आधारित शेती प्रशिक्षक पुनम राऊत व प्रदीप मदने या तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन उपस्थित शेतकर्यांना लाभले.

पुनम राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात देशी गायींचे महत्त्व आणि देशी गाईंपासून नैसर्गिक शेतीसाठी गोमूत्र आणि शेणापासून कसे पूरकखत तयार होते आणि त्या तयार झालेल्या खतांचा वापर करून रासायनिक खत विरहित शेतीतून घेतलेले अन्नधान्याचे उत्पादन मानवी शरीरास किती हितकारक असते याचे महत्त्व पटवून दिले.
व्याख्याते प्रदीप मदने यांनी देशी गायीच्या शेणखतापासून आणि गोमूत्रापासून रासायनिक खतांच्या वापरापेक्षाही उत्तम असे उत्पादन शेतकरी घेऊ शकतो आणि अशा उत्पादित झालेल्या शेतमालाचे अन्नधान्य मानवी आहारस कशी पोषक ठरतात याचे महत्त्व पटवून दिले. तसेच देशी गायीच्या खतापासून जमिनीमध्ये तयार होणारे जिवाणू जमिनीचा पोत राखण्यासाठी समतोलपणा आणण्यासाठी कसे सहाय्य करतात याबद्दलचे सखोल मार्गदर्शन दिले.
फलटण पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. बी. फाळके यांनी देशी गाय हे पशुधन नैसर्गिक शेतीसाठी किती सहाय्य करते आणि पशुधनाचा सांभाळ कसा करावा याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय फलटणचे डॉ. व्ही. टी. पवार यांनी देशी गोवंश पशुधन याचा सांभाळ कसा करावा, त्यांची निगा कशी राखावी आणि त्यांच्या तयार होणार्या खतापासून शेतजमिनीसाठी कसा फायदा होतो आणि अन्नधान्याचे उत्पादन कसे वाढवता येते तसेच पशुधनाबाबत विस्तृत माहिती दिली.
यावेळी उपस्थित अन्य पशुवैद्यकीय अधिकार्यांनी या सर्वच देशी वंश शेती बाबतीत आणि पशुधनाबाबतीत मार्गदर्शन करून शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले.
प्रमुख मार्गदर्शक पुनम राऊत व प्रदीप मदने यांनी दिलेल्या माहितीबद्दल उपस्थित शेतकर्यांनी त्यांना धन्यवाद दिले. यावेळी पत्रकार तथा मागील पंधरा वर्षापासून देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती करणारे राजाभाऊ बोंद्रे यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेस फलटणसह माण तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.