। लोकजागर । फलटण । दि. 21 जून 2025 ।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, या कामासाठी फलटण नगरपालिकेकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असल्याचे, मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांच्या अर्धवट कामांबाबत आणि खड्ड्यांबाबत विविध माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांनी रस्त्यांची पाहणी करुन तातडीने दुरुस्तीच्या कामाचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्याच्या लगेच दुसर्याच दिवशी शहरात हे पॅचवर्कचे काम सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान, शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक, रिंग रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी हे पॅचवर्कचे झाल्याचे पहायला मिळाले असून महात्मा फुले चौक आदी परिसरात रात्री उशिरा काम सुरु होते.

