श्रीराम विद्याभवन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात पंचवीस हजार रूपयांचे संपूर्ण शालेय किटचे वाटप
। लोकजागर । फलटण । दि. 24 जून 2025 ।
आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपल्याला घडविले,त्या शाळा माऊली विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करताना महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटणचा माजी विद्यार्थी सुमित हणमंत जाधव यांनी आपल्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या दहा विद्यार्थ्यांना सुमारे पंचवीस हजार रूपयांचे संपूर्ण शालेय किटचे वाटप केले. त्याचे हे साहित्य वाटपाचे तीसरे वर्ष आहे.

यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष शांताराम आवटे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, सुमितची आई जयश्री, वडील हणमंत जाधव, पत्नी मोहिनी, मुलगा वीरधवल, सासरे लक्ष्मणराव जगताप, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक), भिवा जगताप (माध्यमिक) यांची उपस्थिती होती.
सुमित जाधव हा पुणे येथील सिनेक्रॉन या कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. सुमित जाधव यांची कौटुंबिक परिस्थिती तशी बेतातीच होती. सुमितच्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल श्रीराम विद्याभवन या प्राथमिक शाळेतून झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिक्षणाची पायाभरणी झाली. माध्यमिक शिक्षण याच संस्थेच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. त्यांना दहावी बारावीचे शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. नंतरचे अभियांत्रिकी शिक्षण कसे पूर्ण करायचे या विवंचनेत असताना मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले. सुमितने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपले शिक्षण पूर्ण केले. ते आज पूणे येथील सिनेक्रॉन या कंपनीत उच्च पदस्थ म्हणून कार्यरत आहेत. आपल्याला घडविणारी शाळा आणि मदतीचा हात देणारे गुरुवर्य यांना ते विसरले नाहीत. या शाळेप्रती असणारी आपुलकी, प्रेम व्यक्त करताना शाळेतील गरजू हुशार 10 मुलांना संपूर्ण शालेय किटचे वाटप केले. त्यांच्या या शैक्षणिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

सुमित जाधव यांची कृतज्ञता प्रेरणादायी : रविंद्र बेडकीहाळ
” माणसं मोठी होतात, परंतु मोठी झालेली माणसे मागे वळून पाहत नाहीत. मात्र सुमितने जे भोगले, सहन केले, ते पुढच्या पिढीला भोगायला लागू नये या उद्देशाने तो गेली तीन वर्षे शालेय साहित्याचे वाटप करत आहे. आपल्या शाळा माऊली विषयीची त्याची कृतज्ञता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे”, असे रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
प्रारंभी मनीष निंबाळकर यांनी प्रस्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. हेमलता गुंजवटे यांनी सूत्रसंचालन केले.
