| लोकजागर | सातारा | दि. 20 ऑगस्ट 2025|
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसासह उरमोडी धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे अनेक नदी-नाले भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील काही महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने वाहतूक बंद करून सुरक्षेची उपाययोजना केली आहे.

निसरे पूल परिसरात आलेल्या पाण्यामुळे रस्ता बंद करून तेथे बारिकेट्स उभारण्यात आले आहेत. घटनास्थळी प्रशासनाचा कर्मचारी वर्ग हजर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, उरमोडी धरणामधून सुरू झालेल्या विसर्गामुळे परळी बाजारपेठ ते आंबवडे या मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद करून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, कृष्णा नदीवरील खडकी पूलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. नदीच्या पाण्याचा जोर पाहता पुलावरून वाहनांची हालचाल धोकादायक ठरू शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या काठावर जाण्याचे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
