| लोकजागर | फलटण | दि. २२ ऑगस्ट २०२५ |
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या वतीने महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. या सत्रात विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस दलातील वलेकर मॅडम यांनी मोबाईलचा वापर करताना घ्यावयाची काळजी, त्यातील धोके आणि महिला सुरक्षेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस हवालदार यादव, पोलीस नाईक तांबे मॅडम, वलेकर मॅडम तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर या वेळी उपस्थित होते.
वलेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना निर्भया पथकाची माहिती देत महिला सुरक्षा, छेडछाड तक्रार प्रक्रिया, तसेच “पोलीस काका” आणि “पोलीस दीदी” या संकल्पनांबद्दल सांगितले. यामागचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये पोलिसांविषयी भीती दूर करून विश्वास निर्माण करणे हा आहे.
सुरक्षेशी संबंधित तक्रारी शाळेच्या प्रमुखांकडे किंवा पोलीस ठाण्यात कराव्यात, असा सल्ला देण्यात आला. छेडछाड प्रकरणात दोषी युवकाला प्रथम समुपदेशन करून कारवाई केली जाते, याबद्दलही माहिती देण्यात आली.
बालकांसाठी १०९८ हा हेल्पलाइन नंबर तर तातडीच्या सेवेसाठी ११२ हा नंबर वापरावा, असेही यावेळी सांगण्यात आले. पोलिस दल नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले. या वेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
