। लोकजागर । फलटण । दि. 5 ऑक्टोबर 2025 ।
राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर येत्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्यासाठी विविध समित्यांचे गठन सुरू आहे. विशेष म्हणजे, या समितीत महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे यांचाही सहभाग आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय योगदानाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असून, ही फलटणकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही समिती गठीत केली आहे. “साताऱ्याच्या सांस्कृतिक लौकिकाला साजेसं आणि संमेलनाच्या प्रतिष्ठेला शोभेल असं हे साहित्यिक व ऐतिहासिक दालन उभारण्यात येणार आहे,” अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
या समितीचे मुख्य समन्वयक जगदानंद भटकळ, तर मार्गदर्शक विनोद कुलकर्णी आणि नंदकुमार सावंत आहेत. समितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असून त्यात सचिन प्रभुणे, निलेश पंडित, श्रीनिवास वारुंजीकर, शेखर हसबनीस, रविंद्र झुटींग, जयंत देशपांडे, संदीप डाकवे, अरुण जावळे यांचा समावेश आहे.

मसाप शाहूपुरी शाखेच्या तब्बल १२ वर्षांच्या प्रयत्नांनंतर साताऱ्यात हे संमेलन होणार आहे. या संमेलनामुळे जिल्हाभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून विविध संस्थांच्या बैठका आणि नियोजनाचे काम जोमात सुरू आहे. मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती, ग्रंथदिंडी व शोभायात्रा समित्यांनंतर आता साहित्यिक व ऐतिहासिक दालन समितीच्या स्थापनेमुळे संमेलनाच्या तयारीला नवा वेग मिळाला आहे.
