संरक्षक भिंत आणि नुकसान भरपाई देण्याचे कारखान्याचे आश्वासन; सकारात्मक चर्चेनंतर आंदोलनावर पडदा
। लोकजागर । फलटण । दि. २० जानेवारी २०२६ ।
खडकहिरा ओढ्यातील अतिक्रमण आणि शेतकर्यांच्या नुकसानीप्रश्नी २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देणारे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बर्गे यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. श्रीराम-जवाहर साखर कारखाना प्रशासनाने या प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद देत, ओढ्याला संरक्षक भिंत बांधण्याचे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हा तिढा सुटला आहे.
प्रशासकीय बैठकीत तोडगा
पोपटराव बर्गे यांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने तातडीने दखल घेत एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खडकहिरा ओढ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओढ्याचे पाणी शेतात शिरू नये यासाठी कारखान्याच्या वतीने संरक्षक भिंत (Retaining Wall) बांधून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही व्यवस्थापनाने दिले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय: पोपटराव बर्गे
कारखान्याच्या या निर्णयानंतर बोलताना पोपटराव बर्गे म्हणाले की, “आमचा लढा हा वैयक्तिक नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी होता. कारखाना प्रशासनाने संरक्षक भिंत आणि नुकसान भरपाई देण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत. व्यवस्थापनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे मी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) होणारे आत्मदहन आंदोलन तुर्तास मागे घेत आहे. दिलेल्या शब्दाची पूर्तता लवकरच होईल, अशी आम्हाला खात्री आहे.”
