प्रशासकीय राजवटीत विकास खुंटल्याची भावना
। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. 7 ऑक्टोबर 2025 ।
प्रशासकीय राजवटीत शहराचा विकास खुंटला आहे. आगामी नगरपालिका निवडणूकीसाठी फलटण पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण (खुले) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘काम करणारा नगराध्यक्ष’ हवा, अशी जोरदार मागणी फलटणकरांमधून जोर धरू लागली आहे.
नगराध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी खुले
येत्या काही महिन्यांत नगरपरिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण (खुले) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने चुरस आणखी वाढली आहे. कोणत्याही प्रवर्गातील सक्षम आणि लोकप्रिय उमेदवार या पदासाठी निवडणूक लढवू शकणार असल्याने, अनेक इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. एका तरुण मतदाराच्या मते, ‘‘यावेळी आम्ही केवळ पक्षाकडे किंवा गटाकडे पाहून मतदान करणार नाही, तर शहराच्या विकासाचा ठोस आराखडा असणार्या आणि तो पूर्ण करण्याची धमक दाखवणार्या उमेदवारालाच नगराध्यक्ष म्हणून निवडू’’.

विकासाच्या बाबतीत बारामतीशी तुलना
फलटण शहराच्या विकासाची तुलना सातत्याने शेजारील बारामती शहराशी केली जाते. बारामतीमध्ये झालेले नियोजनबद्ध आणि जलदगतीचे विकासकाम पाहून आपल्या शहराचाही तसाच कायापालट व्हावा, अशी अपेक्षा फलटणमधील नागरिक व्यक्त करतात. बारामतीप्रमाणे आपल्याकडेही दूरदृष्टी असलेले आणि विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व हवे. केवळ प्रशासकीय अधिकार्यांच्या भरवशावर शहराचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे मत एका स्थानिक व्यावसायिकाने व्यक्त केले. ही तुलनाच फलटणकरांच्या मनात विकासाची असलेली भूक आणि सध्याच्या स्थितीबद्दलची नाराजी स्पष्ट करते.
शहराचा विकास हा केवळ पथदिवे, रस्ते किंवा आराखड्यांपुरता मर्यादित नसून, नागरिकांना सोयी-सुविधा, सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती यांचा संगम साधणारा असावा, अशी मतं व्यक्त होत आहेत.

प्रशासकीय राजवटीत विकासाला खिळ
राज्य निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, फलटण नगरपरिषदेच्या शेवटच्या लोकनिर्वाचित मंडळाची मुदत 26 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून नगरपरिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीत शहराच्या विकासाला एक प्रकारे खीळ बसल्याचे बोलले जात आहे. नागरिकांच्या मते, निवडून आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष थेट जनतेला जबाबदार असतात, त्यामुळे विकासकामांना गती मिळते. मात्र, प्रशासकीय राजवटीत निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग थांबतो आणि विकासकामांचा प्राधान्यक्रम केवळ प्रशासकीय सोयीनुसार ठरवला जातो, ज्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडतात किंवा त्यांची गती मंदावते. हे सर्व फलटणकरांनी गेल्या काही काळात अनुभवले असल्याने आता फलटणकरांना खर्या अर्थाने ‘काम करणारा’ नगराध्यक्ष हवा आहे, हेच सध्याच्या वातावरणावरून स्पष्ट होत आहे.
दिग्गजांची नावे चर्चेत
दरम्यान, नगराध्यक्षपद खुले झाल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले या दिग्गजांची नावे राजकीय वर्तृळात चर्चीली जात असून कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
