। लोकजागर । रोहित वाकडे । फलटण । दि. 11 ऑक्टोबर 2025 ।
फलटण नगर पालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असून 13 प्रभागांमधून एकूण 27 नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे; मात्र जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे – या वेळी खरंच काम करणारे नगरसेवक मिळतील का?

पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरासाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण – खुले झाले असून प्रभागनिहाय आरक्षणही नुकतेच गत काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आहे. त्यानुसार प्रभाग क्र. 1: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 3: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. 4: नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी(महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 6: नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. 7: सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 8: नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीओबीसी, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. 9: नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी(महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 10: नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी(महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. 11: नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. 12: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. 13 (तीन सदस्य): नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी(महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले आहे.

यंदाच्या निवडणूकीत प्रभाग रचनेत खूप मोठी उलथा – पालथ झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना निवडणूकीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर मतदारांसमोर जाताना प्रत्येक इच्छुकाने स्वतःचे कठोर आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक आहे.
‘लोकजागर’ ने शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांकडून नगरसेवक कसा असावा ? या अपेक्षांबाबत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, ‘‘ निवडणूक लढवणारा उमेदवार आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यास कितपत सक्षम आहे? त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव किंवा सामाजिक कार्याचा ठसा आहे का? त्यांचे शैक्षणिक आणि वैयक्तिक चारित्र्य कसे आहे? त्यांनी यापूर्वी नागरिकांच्या समस्यांसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे का? निवडून आल्यानंतर नगरसेवक आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी किती उपलब्ध असतील? त्यांचे राहणीमान किंवा काम करण्याची पद्धत अशी असेल? सामान्य नागरिक त्यांना सहज भेटू शकतील कां? की निवडणुकीनंतर शहरात ‘दिसणारच नाही’? निवडणूक लढवणारा उमेदवार केवळ रस्त्या-गटारांपुरता विचार करतो की त्याला संपूर्ण शहराच्या विकासाची दूरदृष्टी आहे? जलसुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, वाहतूक कोंडी यांसारख्या शहरी समस्यांवर त्यांच्याकडे ठोस उपाययोजना आहेत का? नगरसेवकपदाच्या कामात निर्णय घेताना त्यांची निष्पक्षता किती असेल? ते केवळ विशिष्ट गटाच्या किंवा पक्षाच्या हितासाठी काम करणार की सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी उभे राहतील? ज्याच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता असेल आणि जो भ्रष्टाचारमुक्त काम करेल कां?’’, अशा वेगवेगळ्या मुद्यांवर नागरिकांच्या चर्चा रंगत आहेत.
एकूणच, यंदाच्या निवडणुकीत केवळ आश्वासने देणार्यांना नव्हे, तर कामाचा धडाका लावणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे कृतिशील नगरसेवक हवे आहेत; हेच फलटणकर अधोरेखित करत आहेत.
