। फलटण प्रतिनिधी । कोळकी । दि. २५ नोव्हेंबर २०२५ ।
कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारावर माजी उपसरपंच विकास नाळे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, मासिक मीटिंगमध्ये ठरवलेली विकासकामे न करता दुसरीच कामे केली जात आहेत. कोळकी शहरानजीक सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनही सत्ताधारी जाणीवपूर्वक मूलभूत सुविधा पुरवण्यात राजकारण करत आहेत. या ‘नाकर्तेपणाच्या’ कारभाराचा पुराव्यासह ‘पंचनामा’ विकास नाळे यांनी हॉटेल विसावा येथील पत्रकार परिषदेत मांडला.
माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. रेश्माताई देशमुख यांनी यावेळी बोलताना थेट आरोप केला की, कोळकी ग्रामपंचायत कारभारात ‘पतीच्या उचापतीं’ना ग्रामस्थ कंटाळले आहेत. तसेच, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीलाही सत्ताधारी खो घालत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. गावच्या विकासाच्या कामात राजकारण करू नये, ही आमची माफक अपेक्षा होती, असे त्या म्हणाल्या.
विकास नाळे आणि रेश्माताई देशमुख यांनी सांगितले की, मासिक मीटिंगमध्ये एका कामाचा ठराव मंजूर केला जातो आणि नंतर दुसरीच कामे केली जातात. सरपंच मॅडम फक्त चहा पिण्यासाठीच ग्रामपंचायत कार्यालयात येतात आणि त्यांचा कारभार दुसरेच पाहतात, असा थेट आरोप त्यांनी केला. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी ‘सांगतो, करतो, बघतो’ अशी उत्तरे देऊन कामांची टाळाटाळ करत आहेत. यामुळे आमच्या वॉर्डांमध्ये रस्ते, गटार आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नाहीत, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे विद्यमान सदस्यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांच्या या ‘आडमुठ्या भूमिकेमुळे’ कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची निविदा (टेंडर) आणि वर्क ऑर्डर काढली जात नाहीये. यामुळे आता गावच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायत कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे नाळे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रनवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
