| लोकजागर | फलटण | दि. २५ नोव्हेंबर २०२५ |
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रंग प्रभाग क्रमांक आठमध्ये आज जोरदार दिसून आला. शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी या प्रभागात आज हाऊस टू हाऊस (घरोघरी) जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत प्रभाग आठमधील शिवसेनेचे उमेदवार विशाल तेली व सौ. सुवर्णाताई खानविलकर, तसेच माजी नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर, प्रीतसिंह खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ त्यांनी प्रारंभी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन केला आणि त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. मतदारांशी बोलताना श्रीमंत अनिकेतराजे यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले की, “आपल्याला फलटण शहराची संस्कृत शहर म्हणून असलेली ओळख टिकवायची आहे. आपला अनुभव पालिका प्रशासनात आणून फलटणला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.”

“या कामात सर्वांनी योगदान देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी माझ्यासह प्रभाग क्रमांक आठमधील आपले उमेदवार विशाल तेली व सौ. सुवर्णाताई खानविलकर यांना प्रचंड मताधिक्य द्या”, असे आवाहन त्यांनी मतदारांना आवर्जून केले. “श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वात आपल्याला फलटण शहर शांत आणि सुरक्षित ठेवायचे आहे, त्यासाठी फलटणकरांची साथ महत्त्वपूर्ण ठरणार आहे”, असे आवाहन यावेळी उमेदवार विशाल तेली व सौ. सुवर्णाताई खानविलकर यांनी मतदारांना केले.
या प्रचार दौऱ्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. घरोघरी नागरिकांनी अनिकेत राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आदराने स्वागत केले.
