। लोकजागर । फलटण । दि. २८ डिसेंबर २०२५ ।
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अहिल्यानगर (पणदरे) येथील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांच्या साहित्याचा आणि कलेचा जागर पाहायला मिळणार आहे. या संमेलनात त्यांच्या ‘वैखरीचा जागर’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, त्यांच्या बहारदार कथाकथनाचा आस्वादही शनिवार, दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.
प्रा. कोकरे हे केवळ साहित्यिक म्हणून नव्हे, तर या संमेलनाच्या संयोजन प्रक्रियेतही सक्रिय आहेत. त्यांच्याकडे ‘जिल्हा साहित्यिक प्रेरणा ज्योत’ समन्वयक आणि ‘प्रकाशन कट्टा समिती’च्या सदस्यत्वाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी विद्यार्थी संमेलन सहाय्य निधीसाठी ९९९/- रुपयांचे संकलन करून संमेलनाला हातभार लावला आहे.
वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी
उपक्रमशील शिक्षक आणि साहित्यिक चळवळ प्रसारक म्हणून ओळख असलेले रवींद्र कोकरे यांनी कथाकथनाचे जनक शंकर खंडूजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर कथा कार्यशाळा, कथाकथन आणि कथावाचन करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या चळवळीला पाठबळ देण्यासाठी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी या संमेलनाला भेट देऊन त्यांच्या कथाकथनाचा आनंद घेणार आहेत.
कोकरे यांनी सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘वस्ती तिथं वाचनालय’ ही संकल्पना राबवून त्यांनी ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा पोहोचवली आहे. तसेच व्याख्यानमाला, पुस्तक भेट उपक्रम, वृक्षारोपण आणि फलछेदन करून वाढदिवस साजरा करण्याचे त्यांचे विधायक उपक्रम आदर्शवत ठरत आहेत.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
प्रा. रवींद्र कोकरे यांच्या या साहित्यिक कामगिरीबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, प्राचार्य रणदेव खराडे, माळेगाव कारखान्याच्या व्हाईस चेअरमन संगिताताई कोकरे आणि सरपंच बाळासाहेब कोकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
