। लोकजागर । मुंबई / फलटण । दि. २८ डिसेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, युवानेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनी मुंबईत शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी सर्व नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करत, फलटणच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या शिष्टमंडळात नवनिर्वाचित नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पंकज पवार, रूपाली जाधव, अझरुद्दीन शेख, विशाल तेली, कविता मदने, श्वेता तारळकर, विकास काकडे, स्मिता शहा, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर आदींचा समावेश होता.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
निवडणुकीच्या निकालानंतर थेट राज्याच्या प्रमुखांनी दिलेल्या या पाठबळामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. राजे गटाने शिवसेनेच्या माध्यमातून फलटणच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले असून, आगामी काळात शहरातील नागरी सुविधा आणि पायाभूत सोयींसाठी नगरविकास खात्याकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या भेटीमुळे फलटणच्या राजकारणात शिवसेनेची ताकद आणि उपमुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, आता नवनियुक्त नगरसेवक आपल्या प्रभागातील कामांना कशी गती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
