। लोकजागर । फलटण । दि. २८ डिसेंबर २०२५ ।
फलटण शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली असून, विशेषतः क्रांतीसिंह नाना पाटील चौक आता वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले आहे. या भीषण कोंडीमुळे नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी त्रस्त असून, या समस्येचे तातडीने निराकरण न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी प्रशासनाला दिला आहे. या चौकात सातत्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते, कारण पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, शिखर शिंगणापूर, गोंदवले आणि म्हसवड यांसारख्या मोठ्या तीर्थक्षेत्रांकडे जाणारी भाविकांची वाहने याच मार्गावरून जातात. तसेच पुणे, सांगली, सातारा, विटा, बारामती, नगर, नातेपुते, अकलूज आणि सांगोला या प्रमुख शहरांना जोडणारी दळणवळणाची यंत्रणा याच चौकावर अवलंबून आहे.
दशरथ फुले यांनी नमूद केले आहे की, वाहतुकीचा ताण वाढण्यामागे फलटण बस स्थानकातून होणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्यांचे मोठे कारण आहे. दिवसाकाठी जवळपास ७०० ते ८०० एसटी फेऱ्या या चौकातून होत असल्याने कोंडीत मोठी भर पडते. याशिवाय, परिसरात यशवंतराव चव्हाण हायस्कूल असल्याने शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. एमआयडीसीमधील कामगारांच्या बसेस आणि शालेय बसेस याच चौकातून जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि वाढती अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी दशरथ फुले यांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून रिंग रोडने वळवणे, चौकात अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवणे, खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करणे यांचा समावेश आहे. तसेच शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू करावी, बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी आणि परिसरात वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास फलटणकरांच्या हितासाठी मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा फुले यांनी दिला आहे.
