। लोकजागर । फलटण । दि. ११ जानेवारी २०२६ ।
“मराठी पत्रकारितेची भक्कम पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान देशासाठी अतुलनीय आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि विचार आजच्या काळातील पत्रकारितेसाठी मोठा आधार आहेत,” असे प्रतिपादन भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे यांनी केले.
फलटण येथील बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात भारतीय पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या मनोगतात विकास शिंदे यांनी पुढे नमूद केले की, रवींद्र बेडकिहाळ यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि अभ्यासपूर्ण लिखाण केले असून, त्यांच्या या कार्यामुळेच बाळशास्त्रींचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यासाठी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे, राजकुमार बोंद्रे, आप्पासाहेब तांबे, तालुका अध्यक्ष राजकुमार काकडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत आहिवळे, सचिव अमोल पवार, सहसचिव गणेश भोईटे, संघटक प्रशांत सोनवणे, जुबेर कोतवाल, सुहास इतराज, नरेश सस्ते उपस्थित होते.
तसेच बाळशास्त्री जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, अरुण खरात यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
