‘अमर रहे, अमर रहे, विकास गावडे अमर रहे’; साश्रू नयनांनी बरडच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप

शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार; सुदानमध्ये शांती मोहिमेवर असताना आले होते वीरमरण

। लोकजागर । फलटण । दि. १३ जानेवारी २०२६ ।

संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेवर सुदान (दक्षिण आफ्रिका) येथे कार्यरत असताना वीरमरण आलेले भारतीय सैन्य दलातील जवान नाईक विकास विठ्ठल गावडे (वय २९) यांच्या पार्थिवावर काल, सोमवारी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या मूळ गावी बरड (ता. फलटण) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान विकास गावडे अमर रहे’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण बरड परिसर दणाणून गेला होता. आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

फलटण ते बरड : फुलांच्या वर्षावात अखेरचा प्रवास

शहीद विकास गावडे यांचे पार्थिव सुदानवरून विमानाने पुण्यात आणि तेथून लष्कराच्या विशेष वाहनाने सोमवारी दुपारी फलटणमध्ये दाखल झाले. फलटणमधील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात तरुणांनी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तेथून तिरंगा ध्वज लावलेल्या दुचाकी रॅलीसह पार्थिव बरडकडे मार्गस्थ झाले. ग्रामस्थांनी घरासमोर सडा-रांगोळी काढून आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांचा वर्षाव करत वीर जवानाला मानवंदना दिली. सायंकाळी पार्थिव निवासस्थानी नेण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली.

हृदयद्रावक क्षण आणि मान्यवरांची श्रद्धांजली

दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीने आणि पत्नीने पार्थिवाचे दर्शन घेताच उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी राहुल बिष्णोई यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज, तर सिद्धांत चौधरी यांनी तिरंगा आणि कॅप्टन रजत मिश्रा यांनी जवानाचा युनिफॉर्म सन्मानपूर्वक कुटुंबाकडे सुपूर्द केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांसह प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. “देशासाठी दिलेले हे बलिदान सर्वोच्च असून शासन आणि समाज गावडे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना; वडिलांनी दिला भडाग्नी

अंत्यसंस्कारापूर्वी भारतीय सैन्य दल आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून वीर जवानाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. यानंतर सायंकाळी ७ वाजता वडील विठ्ठल गावडे यांनी जड अंतःकरणाने पार्थिवाला भडाग्नी दिला. शहीद विकास गावडे यांनी २०१६ मध्ये सैन्य दलात प्रवेश केला होता. लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीर सारख्या कठीण क्षेत्रात ८ वर्षे सेवा बजावल्यानंतर, सुदानमधील शांती मोहिमेत त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत बलिदान दिले. त्यांच्या जाण्याने बरड गावासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Spread the love