जैन सोशल ग्रुप सर्व समाजातील गरजूंसाठी झटणारी संस्था : अरविंद मेहता; फलटणमध्ये २५ पत्रकारांचा गौरव

। लोकजागर । फलटण । दि. १४ जानेवारी २०२६ ।

जैन सोशल ग्रुप ही केवळ जैन समाजापुरती मर्यादित नसून, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या ६० वर्षांपासून सर्व समाजातील गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली एक महत्त्वाची सेवाभावी संस्था आहे. श्रीमान बिरेनभाई शहा (पुणे) हे या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून महाराष्ट्राकडे जागतिक नेतृत्व असणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन अरविंद मेहता यांनी केले. जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने ‘मराठी पत्रकार दिना’निमित्त शहरातील २५ पत्रकारांचा यथोचित सन्मान व गौरव करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात क्लबचा ठसा

जैन सोशल ग्रुप फलटणच्या माध्यमातून शहरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदान शिबिरे तसेच माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे या क्लबने फलटणच्या सेवा क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटविला असल्याचे मेहता यांनी आवर्जून सांगितले.

पत्रकारांच्या लेखणीचा आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याचा गौरव

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व विशद केले. फलटणमधील पत्रकारांनी आपली पत्रकारिता एका वेगळ्या उंचीवर नेली असून, समाजहिताला प्राधान्य देणारे त्यांचे लिखाण मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच प्रसंगी त्यांनी ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी बाळशास्त्रींच्या जीवनावर लिहिलेल्या तीन खंड स्वरूपातील चरित्र ग्रंथाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि सोहळ्याची सांगता

या दिमाखदार सोहळ्याला जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, मावळते अध्यक्ष राजेंद्र कोठारी, खजिनदार राजेश शहा, संचालक डॉ. मिलिंद दोशी, संचालिका सौ. मनीषा घडिया, प्रसिद्धी अधिकारी विशाल शहा, सौ. अपर्णा जैन आणि अतुल शहा यांच्यासह ग्रुपचे सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. दीप्ती राजवैद्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र कोठारी यांनी मानले.

Spread the love